प्रशासकिय नियोजनामुळे कोरोनाला आळा मुंबई मनपाच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांचे विचार

पुणे – “कोविडच्या काळात बीएमसीसीमध्ये निर्मित केलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामध्ये कोरोना वॉर रूम सुरू करण्यात आली. याच्या माध्यमातून नियोजनात्मक, प्रतिबंधात्मक व व्यवस्थापकीय कार्यवाही २४ तास आणि आठवड्यातील सातही दिवस सातत्याने करण्यात आली. यामुळेच मुंबईमध्ये कोरोनाला नियंत्रित करण्यात आले.”असे विचार मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीतर्फे आयोजित  लीडरशीप वेबिनार सत्रामध्ये ‘कोरोना वॉरियर्स इंन अ‍ॅक्शन’ या कार्यक्रम अंतर्गत त्या बोलत होत्या.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ.एन.टी.राव, प्र कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, एमआयटीचे वरिष्ठ अधिकारी रविंद्रनाथ पाटील आणि डॉ. अनुराधा पराशर हे उपस्थित होते.

अश्विनी भिडे म्हणाल्या,“ कोरोनाविषयक सांख्यिकीय माहिती एकत्र करून त्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. या माहितीच्या आणि विश्लेषणाच्या आधारे प्रतिबंधात्मक कार्यवाहीची व नियोजनाची पुढील दिशा निश्चित केली. तसेच विभागस्तरीय नियोजन व प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही देखील सातत्याने करण्यात आली.”
“या काळात बीएमसीचा एक भाग असल्याने नेतृत्वाची जबाबदारी स्विकारून धारावी या ठिकाणी ज्या पद्धतीने नियोजन केलेे गेले त्यामुळे कोरोनाला जवळपास संपूर्णपणे नियंत्रित करण्यात आले. त्याच प्रमाणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय नागरिकांचे येणार्‍यांचे प्रमाण अधिक होते. त्यांचीही जबाबदारी खूप मोठी होती. मुंबईमध्ये या काळात नियोजन करणे, लोकांना जागृत करणे आणि सदैव तयारीत रहाणे या तीन गोष्टी सर्वात महत्वाच्या होत्या.  त्या गोष्टींच्या आधारावरच पुढील कार्यवाही करण्यात येत असेही त्या म्हणाल्या.”  
डॉ.एन.टी.राव यांनी प्रास्ताविक केले. रविंद्रनाथ पाटील यांनी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली.
डॉ. पोर्णिमा बागची यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: