वेगळ्या पध्दतीने गणित सोडविण्यास प्रोत्साहन मिळावे :सुधाकर आगरकर
पुणे : वेगळ्या पध्दतीने गणित सोडविण्यास प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. परदेशात या नाविन्याला प्रोत्साहन दिले जाते, प्रत्यक्षात भास्कराचार्यांनी ही पद्धत सुरू केली होती. भास्कराचार्यांनी गणित विद्यार्थ्यांना ९०० वर्षांपूर्वी स्वातंत्र्य दिले ते महत्वाचे आहे .सतत सराव करून गणिताची भीती जाते ',असे प्रतिपादन गणिताचे अभ्यासक डॉ सुधाकर आगरकर यांनी केले.
‘भास्कराचार्यांच्या ‘लीलावती’ ग्रंथावर ‘अंकनाद’ आयोजित झालेल्या वेबिनार मध्ये शनीवारी सायंकाळी त्यांनी हे प्रतिपादन केले . या सत्रात ‘ घन आणि घनमूळ ‘ यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, ‘ ९०० वर्षापूर्वी भागाकाराची ,वर्गमूळ, घनमूळ काढण्याची पद्धत अस्तित्वात होती ,तिचा परिचय करून घेणे अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे ठरते.
‘अंकनाद ‘ या गणिताची गोडी लावण्याकरिता तयार करण्यात आलेल्या अॅप कडून थोर भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्यांच्या ‘ लिलावती ‘ या ग्रंथावर वर वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.
. वर्षभर हा वेबिनार उपक्रम चालणार आहे. वैशाली लोखंडे यांनी प्रास्ताविक केले,आसावरी बापट यांनी भास्कराचार्यांच्या श्लोकांचे गायन केले .समीर बापट यांच्यासह विद्यार्थी,शिक्षक सहभागी झाले.
आद्य गणिती भास्कराचार्य यांच्या लीलावती या महान ग्रंथाच्या विवेचनाच्या माध्यमातून भारताला लाभलेला बुद्धिमत्तेचा वारसा रंजक पद्धतीने उलगडला गेला .
गणित हे सर्व शास्त्रांची माता आहे. तर्काचे मूळ गणितामुळे जपले जाते.त्यामुळे गणिताशी मैत्री होणे,महत्वाचे आहे. भारतीय गणिती वारसा पुढे आणण्याच्या उद्देशाने,आपल्या इतिहासात दडलेलं गणिती वैभव मांडणारा एक अभिनव उपक्रम म्हणून ‘ अंक नाद ‘ अॅपने पुढाकार घेतल्याची माहिती मॅप एपिक कम्युनिकेशन्स् चे संचालक मंदार नामजोशी यांनी दिली.’पाढे पाठांतर स्पर्धेची माहितीही त्यांनी दिली.आतापर्यंत अंक नादच्या माध्यमातून गणितासंबंधी विविध विषयांवर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते,त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला.
