भविष्यात संशोधनासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आधार – प्रा. डॉ. नीरज सक्सेना

पुणे : “संशोधन ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे भविष्यातील संशोधन हे पूर्णतः कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) केंद्रित असणार आहे. विद्यार्थ्यांनी अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करावे. सर्जनशीलतेला मारक असलेली परीक्षा पद्धती रद्द करून विद्यार्थ्यांचे विविधांगी मूल्यांकन होणे गरजेचे आहे. त्यातून संशोधन, इनोव्हेशन, इनव्हेन्शन आणि प्रॉडक्शन या गोष्टीना उभारी मिळेल,” असे मत अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) इन्स्टिट्यूशनल रिसर्चचे सल्लागार डॉ. नीरज सक्सेना यांनी व्यक्त केले.

पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि नवी दिल्ली येथील सेंटर फॉर एज्युकेशन ग्रोथ अँड रिसर्च (सीईजीआर) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मान्यता आणि गुणवत्ता वर्धनात प्रभावी संशोधनाचे महत्त्व’ या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये डॉ. नीरज सक्सेना बोलत होते. इंडस्ट्री-अकॅडमी समन्वय, युवा वर्गाला संशोधनासाठी प्रोत्साहन आणि नवकल्पनांतून निर्मिती यासाठी ‘आयडिया लॅब’ राबविण्यात येत असल्याचेही डॉ. सक्सेना यांनी नमुद केले. 
प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंटर्नल क्वालिटी ऍश्युरन्स सेलच्या संचालिका प्रा. डॉ. सुप्रिया पाटील, गुरु जांभेश्वर युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे कुलगुरू प्रा. डॉ. तानकेश्वर कुमार, हिमगिरी झी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. डॉ. राकेश रंजन, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष व सीईजीआर’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, ‘सीईजीआर’चे संचालक रविश रोशन, एमरल्ड पब्लिशिंग इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुंदर राधाकृष्णन, ‘सूर्यदत्ता’चे समूह संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. शैलेश कासंडे, कार्यकारी संचालक प्रा. सुनील धाडीवाल आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. नीरज सक्सेना म्हणाले, “बऱ्याचदा संशोधन हे रिसर्च पेपर आणि पेटंट यापुरतेच मर्यादित राहिल्याचे दिसते. औद्योगिक आणि शिक्षणसंस्था यांच्यातील समन्वय वाढवायला हवा. त्यातून गुणवत्तापूर्ण संशोधनाला चालना मिळेल. संशोधन चांगले होऊन त्यातून उत्पादननिर्मिती झाली तर त्याची उपयुक्तता अधिक आहे. उपयोजित, समाजाभिमुख संशोधन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन, इन्व्हेन्शन आणि उत्पादन याच गोष्टी शिक्षण संस्थेची गुणवत्ता व मान्यता वाढवण्यात महत्वाचे ठरते.”
प्रा. डॉ. सुप्रिया पाटील म्हणाल्या, “ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कायमच संशोधन व गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. सर्व संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना संशोधनाला चालना मिळावी, यासाठी ‘अविष्कार’सारख्या स्पर्धा घेतल्या जातात. निमशहरी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांतील कौशल्य, नवकल्पना त्यातून समोर येतात. ‘अविष्कार’ ही केवळ एक स्पर्धा नाही, तर इनोव्हेशन, संशोधन दाखविण्याचे व्यासपीठ आहे. ‘अविष्कार’सह ‘अस्पायर’, रिसर्च पार्क, इन्क्युबेशन सेंटर, सायन्स पार्क आदी उपक्रमांतून विद्यार्थ्यांना संशोधन व इनोव्हेशनसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “सर्वांगीण व मूल्याधिष्ठित शिक्षणाचा अंतर्भाव अभ्यासक्रमात व्हायला हवा. संशोधन ही सर्वकाळ चालणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांतील संशोधन क्षमता विकसित करण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन स्तरावर संशोधन करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. समाजाभिमुख संशोधनाची गोडी विद्यार्थीदशेतच लागली, तर शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. अनुभवाधारित शिक्षण आणि संशोधन हेच गुणवत्ता वाढीचे पैलू आहेत. सामाजिक जाण आणि राष्ट्रप्रेमाची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवायला हवी. उपयोजित संशोधनासाठी संयुक्त संशोधन प्रकल्प करण्यावर भर हवा.”

Leave a Reply

%d bloggers like this: