Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

‘एकपात्री’मध्ये लागतो अभिनयाचा अधिक कस स्वरुप कुमार यांचे मत

पुणे : “नाटकात जेवढ्या भूमिका तेवढे कलाकार असतात. त्याला ठराविक संहिता असते. रंगमंचावर मुक्त वावर करता येतो. एकपात्री नाट्यामध्ये मात्र अनेक भूमिका एकाच कलाकाराला साकाराव्या लागतात. आपल्या अभिनयातून विविध भूमिका वठवत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागते. त्यामुळे एकपात्री कला सादर करताना अभिनयाचा अधिक कस लागतो. त्यातून कलाकार समृद्ध होत जातो,” असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक स्वरुप कुमार यांनी केले.

ज्येष्ठ एकपात्री कलाकार मधुकर टिल्लू यांचा २१ वा स्मृतिदिन व हास्यषष्ट्यब्दीपूर्ती वर्षानिमित्त एकपात्री कलाप्रसार दिनाचे औचित्य साधून एकपात्री कलाकार परिषदेच्या वतीने १ जून (स्मृतिदिन) २ जुलै (जन्मदिन) या कालावधीत आयोजिलेल्या एकपात्री कला महोत्सवाचे उद्घाटन स्वरूप कुमार यांच्या हस्ते झाले. महिनाभर चालणाऱ्या या कला महोत्सवात ५० पेक्षा अधिक कलाकार आपली कला सादर करणार आहेत. स्वरुपकुमार यांच्या ‘श्री व सौ भंपकजी आडमुठे’ यांच्या एकपात्री प्रयोगाने या महोत्सवाची सुरुवात झाली.

“महाराष्ट्रात एकपात्रीची नवी पिढी निर्माण करण्यात मधुकर टिल्लू यांचे मोठे योगदान होते. त्यांनी अनेक नवे कलाकार घडवले. म्हणूनच १ जून हा एकपात्री कलाप्रसार दिन म्हणून साजरा होत आहे. आज अनेक एकपात्री कलाकार प्रेक्षकांना हसवत आहेत, याचा आनंद वाटतो. नाट्यप्रयोग करताना माझ्या सर्व सहकाऱ्यांचे योगदान मोलाचे होते. प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आता एकपात्री कला माझ्या आयुष्यात आनंद देणारी ठरत आहे,” असेही स्वरूप कुमार यांनी नमूद केले. वयाच्या ८७ व्या वर्षीही त्याच बखुबीने स्वरूप कुमार यांनी सादर केलेल्या ‘श्री व सौ भंपकजी आडमुठे’ या नाट्याने प्रेक्षकांना भरभरून हसवले.

कथाकार द. मा. मिरासदार कथाकथन स्पर्धेच्या विजेत्यांची नावे यावेळी घोषित करण्यात आली. सुरेंद्र गुजराथी यांना प्रथम, अनुपमा कुलकर्णी यांना द्वितीय तर मेधा पाटील, पल्लवी परब आणि राहुल भालेराव यांना विभागून तृतीय पारितोषिक जाहीर झाले. प्रसंगी एकपात्री कलाकार परिषदेचे अध्यक्ष दीपक रेगे, उपाध्यक्षा चैताली माजगावकर-भंडारी, सचिव नरेंद्र लवाटे यांच्यासह दिलीप हल्ल्याळ, मकरंद टिल्लू आदी उपस्थित होते. या उपक्रमास ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, विजय पटवर्धन यांनी शुभेच्छा दिल्या.

मकरंद टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले. दीपक रेगे यांनी प्रास्ताविक केले. दिलीप हल्ल्याळ यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading