ग्रीन हायड्रोजेनमुळे कार्बन उत्सर्जन शून्य प्रमाणात डॉ. दिलावर सिंग यांचे मत
पुणे : “नैसर्गिक साधनसंपत्ती, प्रदूषण आणि निसर्गाचा समतोल साधनाताना ग्रीन हायड्रोजन २१ व्या शतकातील इंधन म्हणून उत्तम पर्याय ठरत आहे. ग्रीन हायड्रोजेनमुळे कार्बनचे उत्सर्जन शून्य प्रमाणात होते. हायड्रोजन तंत्रज्ञानावरील वाहने इतर इंधनापेक्षा किंवा इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा अधिक कार्यक्रम असतात,” असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियास्थित हायड्रोजन निर्मिती प्रकल्प साकारणारे डॉ. दिलावर सिंग यांनी केले.
टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर असोसिएशनतर्फे (टीटीए) आयोजित ‘ग्रीन हायड्रोजन : २१ व्या शतकाचे इंधन’वर या व्याख्यानात डॉ. सिंग बोलत होते. झूम मिटद्वारे झालेल्या या व्याख्यानावेळी ‘टीटीए’चे अध्यक्ष यशवंत घारपुरे, सचिव वसंत शिंदे, सहसचिव अजित चौगुले, डॉ. प्रमोद देशपांडे आदी उपस्थित होते. ‘टीटीए’चे हे ५८ वे व्याख्यान होते.
डॉ. दिलावर सिंग म्हणाले, “हायड्रोजन हा निसर्गातील सर्वात मोठा घटक आहे. पृथ्वीवर वायू म्हणून मुक्तपणे उपलब्ध नसला, तरी पाणी आणि जीवाश्म इंधन यांसह अनेक सामान्य पदार्थांमध्ये असतो. ग्रीन हायड्रोजन नवीन इंधन म्हणून उदयास येत आहे. बऱ्याच देशात या इंधनाचा वापर वाहने रेल्वे, विमान चालवण्यासाठी केला जातो. भारत सरकारला ८० टक्के क्रूड ऑइल आयात करावे लागते. याला ग्रीन हायड्रोजन उत्तम पर्याय आहे. याचा निर्मिती खर्च जास्त असला तरी देशात तंत्रज्ञान विकसित करून मोठ्या प्रमाणात हायड्रोजनचे उत्पादन करून खर्च कमी होऊ शकतो.”
सिंग यांनी वेदांतामध्ये उल्लेख असलेल्या तंत्रज्ञानापासून ते ग्रीन हायड्रोजन सध्याच्या घडीला कसे उपयुक्त आहे, यावर आपले विचार मांडले. बाकी इंधनापेक्षा ग्रीन हायड्रोजन स्वस्त आहे, पेट्रोल, बॅटरीपेक्षा आपण ग्रीन हायड्रोजनचा वापर स्वस्त आहे. या हायड्रोजनची साठवणूक आपण गॅस, सिलेंडर किंवा भुमिगत सुद्धा करू शकतो, यापासून पावर निर्मित होते, तेल, वायू, रसायने, ऊर्जा, खाण आणि धातू, औद्योगिक उत्पादने, वाहने आणि बांधकाम या सर्व क्षेत्रात याचा वापर होऊ शकतो. जेवढे जास्त आपण उत्पादन करू तेवढी त्याची किंमत कमी होईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
डॉ. दिलावर सिंग यांनी ऑस्ट्रेलियात सन ब्रिलियन्स कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी पश्चिम ऑस्ट्रेलियात दोन लाख टन प्रति वर्ष ग्रीन हायड्रोजन निर्मिती प्रकल्प हाती घेतला आहे. तसेच त्यांनी सौर ऊर्जा प्रकल्प, लिथियम बॅटरी प्रकल्प उभारले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित चौगुले यांनी केले. यशवंत घारपुरे यांनी आभार मानले.
