मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोनमुळे खळबळ
मुंबई, दि. ३० : एका निनावी फोनद्वारे मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली असून मंत्रालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंत्रालयातील कंट्रोल रूमला बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आला होता. त्यानंतर बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झाले असून सातही मजल्यावर वेगवेगळ्या पथकाद्वारे शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, निनावी धमकीच्या फोनमुळे मंत्रालयाला छावणीचे स्वरूप आले आहे.
दुपारी दोनच्या सुमारास हा निनावी धमकीचा फोन मंत्रालयात आला होता. एक संशयित वस्तू मंत्रालय परिसरात ठेवण्यात आल्याचे त्या फोनवरुन सांगण्यात आले होते. त्यानंतर पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. सुदैवानं आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुट्टी आहे. दरम्यान, हा फोन कोणी केला? याचा शोध सुरू आहे.
