अहिल्याबाईंचे कार्य अतुलनीय – माजी आमदार मेधा कुलकर्णी
पुणे : ज्यावेळी हिंदू धर्मावर मोठे संकट आले, मंदिरे तोडली जात होती. त्यावेळी हातामध्ये भगवान शंकराची पिंड घेऊन मंदिर उभारणी व त्याबद्दलची विचारसाधना रुजविण्याचे काम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केले. त्याकाळी महिला राजकारणात नव्हत्या, अशा काळात अहिल्याबाईंनी केलेले कार्य अतुलनीय आहे, असे मत माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
श्रमिक फाऊंडेशनतर्फे हिंगणे होम कॉलनी सभागृह कर्वेनगर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष वरक तसेच विकास माने यांनी केले.
यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र खेडेकर, रवी ननावरे, भगवान शिंदे, प्रकाश घंटी, नगरसेविका वृषालीताई चौधरी, स्वप्निल दुधाने, पांडुरंग खरात, योगेश खरात, सचिन फोलाने, मंगेश कोकरे, भरत लगड, कल्याण आढागळे, सुशांत भिसे, दत्ता रेणुसे, भानुदास जोशी, निलेश खरात, सचिन खरात, दत्तात्रय चौधरी, किशोर शेडगे, सुनील शिंदे, संतोष जानकर, लहू ओव्हाळ, नितीन ननावरे आदी उपस्थित होते. अहिल्याबाईंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन उपस्थितांच्या हस्ते झाले.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, कोरोनाच्या काळात आपल्या माणूस आणि माणुसकी पहायला मिळाली. माणसांमध्ये चारच जाती आहेत. त्याम्हणजे ए, बी, एबी आणि ओ हे रक्तगट. त्यामुळे रक्तदानासारखे कार्य करुन आपल्यातील माणुसकी प्रत्येकाने जीवंत ठेवायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
रक्तदात्यांना नागरिक सुरक्षा पॉलिसी अंतर्गत व्यक्तिगत अपघात व हॉस्पिटल खर्चाचा १ लाख रुपयांचा विमा काढून देण्यात आला. जयमल्हार सेना, शिवसंग्राम संघटना यांसह अखिल धनगर समाज महासंघ, अखिल कोकण युवा संघ, सामर्थ्य प्रबोधिनी, एल्गार सेना, सह्याद्री प्रतिष्ठान, यशवंत सेना, पुणे ब्लड बँक, सुर्योदय फाऊंडेशन, श्रमिक ज्ञानदीप मित्र मंडळ आदी संस्था-संघटनांनी सहभाग घेतला.
