भाजपच्या रडारवर असलेल्या अनिल परब यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार
नाशिक – राज्यभरात प्रादेशिक परिवहन विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप एका निलंबित मोटार वाहन निरीक्षकाने केला आहे. त्यावरुन पंचवटी पोलिसांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मागील काही दिवसांपासून भाजप च्या रडारवर असलेल्या अनिल परब यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने महाविकास आघाडी सरकारच्या तिसऱ्या मंत्र्याची विकेट पडणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आरटीओतील निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील हे नाशिकला मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होते.
या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकारामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, मुंबईतील परमबिरसिंग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून अत्यंत सावधगिरीने हे प्रकरण हाताळले जात आहे. या प्रकरणामुळे प्रादेशिक परिवहन विभागाची कार्यपद्धती चव्हाट्यावर आली आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त दीपक पांड्येय यांनी याप्रकरणाची पुढील ५ दिवसांत चौकशी करुन तसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपायुक्त संजय बारकुंड हे या प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
गजेंद्र पाटील यांनी एक तक्रार दाखल करत परिवहन विभागात सुरू असलेल्या गैरव्यवहाराबाबत आरोप केले आहेत. या आरोपात परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन आयुक्तांचे नाव घेतले आहे. ट्रान्सफर पोस्टिंगमध्ये होणारे गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार यासाठीचे आरोप आहेत. परिवहन विभागाअंतर्गत कशी पैशांची वसुली केली जाते. गजेंद्र पाटील यांना दोन वेळा समन्स पाठवून चौकशीला बोलावण्यात आले आहे. तक्रारीचे गंभीर स्वरूप पाहूनच डीसीपी क्राईम यांच्यासह आणखी दोन डीसीपी या संपुर्ण प्रकरणामध्ये चौकशी करत आहेत. या तक्रारीची लेखी प्रत गजेंद्र पाटील यांना देण्यात आली आली असून चौकशीचे आदेश झाले आहेत. त्यांची तब्येत २७ मे हायकोर्टात रिट याचिकाही दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी दिली.
दरम्यान, निलंबित मोटार वाहन निरीक्षक निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर ५ अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक येथे दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे. मंत्र्यांवर आरोप करून राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही असे भासवून उच्च न्यायालयामार्फत चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मालिन करणे, या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार आहे. या तक्रारीची नाशिक पोलीस चौकशी करीत असून, चौकशीअंती सत्य जनतेसमोर नक्कीच येईल. असे अनिल परब यांनी ट्विट द्वारे म्हटले आहे.
