fbpx
Friday, April 26, 2024
Business

कोविड-19 संकटाला तोंड देण्यासाठी ‘बजाज अलियान्झ लाइफ’तर्फे कर्मचार्‍यांना सर्वसमावेशक सहाय्य

पुणे – ‘कोविड-19’चा प्रादुर्भाव भारतात फार मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने, ‘कॉर्पोरेट इंडिया’साठी कर्मचार्‍यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही एक प्राधान्याची बाब झाली आहे. ‘बजाज अलियान्झ लाइफ’ ही भारतातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेली कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना या आव्हानात्मक काळाला सामोरे जाण्यास सहाय्य करण्याकरीता अनेक आधारभूत उपक्रम राबवीत आहे. आपले कर्मचारी आणि सर्व भागधारक यांच्यासाठी ही कंपनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक कल्याणकारी कार्यक्रम आणि सल्ला केंद्रदेखील चालवते.

कोविड प्रभावित कुटुंब सहाय्य कार्यक्रम : कोविड-19 साथीचा फटका बसलेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य कंपनी देईल. ही देय रक्कम ‘ग्रुप टर्म लाइफ इन्शुरन्स’ योजनेच्या अतिरिक्त असेल. कर्मचाऱ्यांच्या दोन मुलांना पदवी स्तरापर्यंतच्या शिक्षणासाठी कंपनी दोन लाख रुपयांपर्यंत सहाय्य देईल आणि मृत कर्मचार्‍याच्या कुटुंबाला 5 वर्षांपर्यंत निरंतर आरोग्यविमा लाभ देईल. याव्यतिरिक्त, कंपनीने किमान मुदतीच्या आयुर्विम्याचे संरक्षण 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढविले आहे, तसेच आपल्या कर्मचार्‍यांना 1 लाख रुपयांचे कोविड आरोग्यविमा संरक्षण देण्याचा प्रस्ताव दिला आहे. कर्मचाऱ्यांना सध्या देण्यात येत असलेल्या ‘मेडिक्लेम पॉलिसी कव्हर’पेक्षा हा आरोग्यविमा अतिरिक्त स्वरुपाचा असेल.

‘कोविड’ने बाधित झालेला कर्मचारी घरात विलगीकरणामध्ये राहात असल्यास, त्याला त्या कालावधीत वैद्यकीय सल्ला, टेलिमेडिसीन्स, चाचण्या व तपासण्या इत्यादींसाठी मेडिक्लेम पॉलिसीद्वारे 20 हजार रुपयांपर्यंतची रक्कम कंपनी देईल.

कोविड हेल्पलाइन : कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना व त्यांच्या कुटुंबियांना रुग्णालयामध्ये दाखल होण्याबाबत; ऑक्सिजन, औषधोपचार,  डॉक्टरांचा सल्ला मिळण्याबाबत आणि इतर आवश्यक बाबींचे तातडीचे सहाय्य मिळण्याबाबत एक विशेष कोविड हेल्पलाइन सुरू केली आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्याबाबतचे सहाय्य : कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या आरोग्याच्या समस्येवर सामान्य व तज्ञ डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला, चिकीत्सा व शिफारस मिळावा, यांसाठी दिवसाच्या कोणत्याही वेळी उपलब्ध होईल, अशा सेवा भागीदारीतील ‘डॉक्टर 24×7’ या संस्थेशी कंपनीने करार केला आहे.

कर्मचार्‍यांच्या मानसिक, शारीरिक, आर्थिक, व्यावसायिक आणि भावनिक कल्याणासाठी कंपनीने ‘राउंड ग्लास’ या एका वैश्विक समग्र कल्याणकारी कंपनीशीही करार केला आहे.

या उपक्रमांबद्दल भाष्य करताना, ‘बजाज अलियान्झ लाइफ’चे मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी (सीएचआरओ) संतनू बॅनर्जी म्हणाले, “बजाज अलियान्झ लाइफमध्ये कर्मचाऱ्यांचे कल्याण ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, आणि या अभूतपूर्व काळात त्यांच्यासोबत राहून त्यांना आधार देण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व काही करू. कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब सुरक्षित व निरोगी आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करीत आहोत. सध्याच्या आव्हानात्मक काळात आमच्या कर्मचार्‍यांनी प्रचंड हिंमत आणि इच्छाशक्ती दर्शविली आहे. आम्ही या काळावर मात करू आणि या कोविड साथीतून एकत्रित बाहेर पडू.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading