सामाजिक भान बाळगून प्रत्यकाने सामाजिक कर्तव्य निभवावे – डॉ. अभिजित वैद्य

पुणे – संकटकाळात सामाजिक भान बाळगून मदतीचा हात पुढे करणे हे प्रत्येकाचे सामाजिक कर्तव्य असल्याचे मत आरोग्य सेनेचे संस्थापक राष्ट्रीय प्रमुख डॉ. अभिजित वैद्य यांनी व्यक्त केले.

कामगार आणि महाराष्ट्र दिनाचे आैचित्य साधून आरोग्य सेना आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने १०२ रिक्षा रुग्णवाहिका म्हणुन कार्यरत असणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, ससून रूग्णालयासमोर या उपक्रमाचे उद्घाटन वैद्य यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

या उपक्रमाबाबत बोलतांना वैद्य म्हणाले, आरोग्य सेना आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेला १०२ रिक्षा रुग्णवाहिकेचा उपक्रम १ मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन ते संपूर्ण लॉकडाउन २४ तास मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोरोनाग्रस्त जनतेच्या असाहाय्यतेचा फायदा उठवत जेंव्हा कोणी रुग्णवाहिकांचा तर कोणी औषधांचा बाजार मांडला तेंव्हा महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे हे कोविड योद्धे रिक्षा चालक निर्भयपणे जनतेच्या सेवेसाठी उभे राहिले. या संकटातून देशाला दोनच गोष्टी वाचवतील, एक निरपेक्ष मानवता आणि दुसरे राजकीय परिवर्तन.

बाबा कांबळे म्हणाले, ‘आरोग्य सेनेने आमच्या खांद्याला खांदा भिडवल्यामुळे आम्ही काही दिवसांपूर्वी सुरु केलेली ही अभिनव सेवा खूप मोठे स्वरूप घेवू शकली आहे. या सेवेची व्याप्ती वाढविण्याचा आमचा दोन्ही संघटनांचा मानस आहे.”

या कार्यक्रमाला आरोग्य सेनेच्या वतीने केंद्रीय समिती सदस्य डॉ. नितीन केतकर, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर कार्याध्यक्ष शफिक पटेल, उपाध्यक्ष अरशद अन्सारी, कुमार शेट्ये, मुराद काझी आदी उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पाच रिक्षा रुग्णवाहिकांवर उपक्रमाची माहिती आणि संपर्क मोबाईल क्रमांक असलेले स्टीकर चिकटवून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
गरजू रुग्णांनी या सेवेसाठी ९८५०४९४१८९ व ७८४१०००५९८ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.

Leave a Reply

%d bloggers like this: