Tuesday, June 16, 2026
MAHARASHTRA

पोलिसांनी स्वत:च्या आरोग्य सुरक्षेसह कायदा सुव्यवस्था राखावी – गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई

औरंगाबाद, दि. २  – कोरोनाच्या संकटात पोलीस यंत्रणा ही आरोग्य यंत्रणेसह दिवसरात्र काम करत असून स्वत:च्या आरोग्य सुरक्षेसह पोलिसांनी कायदा सुव्यवस्था चोखरित्या राखावी असे निर्देश शंभूराजे देसाई , राज्यमंत्री, गृह (ग्रामीण)  यांनी आज येथे दिले.

पोलीस अधीक्षक कार्यालय औरंगाबाद ग्रामीण येथे आयोजित जिल्हास्तरीय कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना,कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत गृह राज्यमंत्री श्री.देसाई बोलत होतेृ यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक के.मल्लिकार्जून प्रसन्ना, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी ,संबंधित  पोलीस अधिकारी उपस्थित होते.

गृह राज्यमंत्री देसाई यांनी यावेळी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीबाबत आढावा घेऊन ग्रामीण परिसरातील संसर्ग रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच दुसऱ्या लाटेत आता ग्रामीण भागातील संसर्गाचे प्रमाण वाढलेले असून त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत संचारबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खबदारीपूर्वक काम करण्याचे सूचित केले. तसेच पोलिसांच्या त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य उपचार सुविधांची विशेष काळजी घेण्यात यावी. ऑक्सिजन साठा, औषधी, खाटांची उपलब्धता पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात तसेच पोलीस वसाहती अधिक सुविधांयुक्त करण्यासाठीच्या बाबींची पूर्तताही प्राधान्याने करावी, अशा सूचना यावेळी देसाई यांनी दिल्या.तसेच महिला बिट अंमलदार यांना प्रोत्साहित करून विशेष प्रशिक्षण देऊन पहिल्यांदाच त्यांना फिल्ड वर्क तसेच गुन्हे तपास करण्याची संधी उपलब्ध करून दिल्या बाबत श्री.देसाई यांनी आनंद व्यक्त केला आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक के.मल्लिकार्जून प्रसन्ना यांनी कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवण्याच्या दृष्टीने आंतरजिल्हा चेकपोस्टवर पोलीस यंत्रणेमार्फत राबवण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. त्याचप्रमाणे औरंगाबाद विभागात महिला पोलिसांनी बीट अंमलदार म्हणून जबाबदारी पार पाडण्यासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात येत असून या उपक्रमाबाबतची माहिती प्रसन्ना यांनी यवेळी दिली.

यावेळी जिल्हा पोलीस दलातील सपोनि  विश्वास रोहीदास पाटील, व सफौ जनार्धन बाबुराव मुरमे, यांनी सतत 15 वर्षे उत्तम सेवाभिलेख ठेवल्याबद्दल त्यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह देऊन  राज्यमंत्री देसाई यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading