fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

संगीत कलाकार विनय चित्राव यांना विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून श्रद्धांजली

दिग्गजांनी स्मरल्या एका दिलदार व्यक्तिमत्वाच्या आठवणी 

पुणेः- संगीताच्या सान्निध्यात आणि राष्ट्रीय स्वयंसेलक संघच्या मुशीत तयार झालेला हरहुन्नरी अष्टपैलू हाडाचा कार्यकर्ता आणि संवेदनशील कलाकार विनय चित्राव यांच्या माध्यमातून गमवल्याची भावना विविध क्षेत्रातील व्यक्तिंनी विनय चित्राव यांच्या स्मृतीप्रत्यर्थ आयोजीत ऑनलाईन श्रद्धांजली सभेत व्यक्त केली.

प्रसिद्ध गायक आनंद भाटे म्हणाले की, विनयचा स्वभाव मनमिळावू होता. तंबोरे लावण्यात त्याचा हातखंडा होता. तंबोरा या वाद्याविषयी त्याच्या मनात प्रेम आणि आदर होता. कार्यक्रमस्थळी वाद्य नेणे, ते परत व्यवस्थित आणणे या सगळ्या जबाबदा-या तो एकट्याने पार पाडायचा. साथ संगतीला तो सोबत असल्याचा मोठा आधार वाटायचा. तो केवळ संगीत साथीपुरता मर्यादित नव्हता, तर त्याचे भावबंध मित्रत्वा पर्यंतचे होते.

सामाजिक कार्यकर्ते विश्र्वंभर चाैधरी म्हणाले की, 1993-94 च्या काळात प्रभा अत्रे यांच्या गायनमैफलीच्या निमित्ताने आमची ओळख झाली. पुढे 27-28 वर्षे आमच्यातील मैत्रीचे बंध कायम राहिले.आमची दोघांची विचारधारा भिन्न होती. पंरतू, त्या भिन्न विचारसरणीचा आमच्या मैत्रीवर परिणाम झाला नाही. 2014 मध्ये मोदी केंद्रात सत्तेवर आल्यावर मित्र म्हणून तो माझी थट्टा करायचा, पंरतू त्यात मैत्रीचा भाव होता. देणे हा विनयचा स्थायीभाव होता. त्याच्यात दातृत्वता होती. काम करुन मोकळे व्हायचे, श्रेय घ्यायेचे नाही असा त्याचा स्वभाव होता.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुण्याचे कार्यवाह महेश करपे म्हणाले की, देशासाठी काम करण्याची प्रेरणा घेऊनच विनय काम करीत होता. संघाचे मुख्य कार्यालय आणि चित्राव कुटुंबियांचे घरही शनिवार पेठेतच असल्याने तो फार आधीपासून संघाशी जोडला गेला. त्याने त्याची जगण्याची प्रेरणा कामातून सिद्ध केली.

प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी म्हणाले की, कोविडमुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडले. त्याचा सर्वात मोठा फटका कला क्षेत्राला बसला आहे. कोविडमुळे अलीकडे ज्या कलाकारांचे निधन झाले ते गायन आणि वादन क्षेत्रातील गंधर्वांचे अवतार होते. विनय हा अभिषेकी परिवारातील एक होता. त्याने गांधर्व महाविद्यालयाला वाहून घेतले होते. अकल्पित आणि अविश्वसनीय अशीच ही घटना म्हणावी लागेल.

आमदार मुक्ता टिळक यांच्यावतीने बोलताना शैलेश टिळक म्हणाले की, विनय चित्राव तसा मितभाषी होता. परंतू पक्षकार्य म्हटले की, त्याच्यात उत्साह संचारायचा. पक्षाचे कोणतेही काम असो, एकदा जबाबदारी घेतली की ते काम तडीस जाणारच हा विश्वास त्यांने त्याच्या वर्तनातून सिद्ध केला होता. संगीत क्षेत्रात कार्यरत असल्याने तो प्रचंड संवेदनशील होता. सर्वसामान्य नागरीकांच्या समस्या त्या परिसरातील नेतृत्वा पर्यंत पोहचवणे आणि त्या समस्या सोडवणे याच्यात त्याचा हातखंड होता.

विनय चित्राव यांच्या आठवणींना उजाळा देतांना प्रसिद्ध गायक -हृषीकेश बडवे म्हणाले की, गांधर्व महाविद्यालयाच्या माध्यमातून आमची ओळख झाली होती. पंरतू सांगीतिक क्षेत्रात कार्यकर्त्याच्या भूमिकेतून सदैव वावरणारा आणि गांधर्व महाविद्यालयाचा संगातातील जाणकार मित्र असे दुहेरी नाते होते. निस्वार्थी वृत्तीने केलेल्या कोणत्याही मदतीच्या परतफेडीची त्यांनी कधीही अपेक्षा ठेवली नाही.

यावेळी बोलताना शास्त्रीय गायिका रेवती कामत म्हणाल्या की, विनय चित्राव हे कलाकारांना तंबो-यावर केवळ साथसंगत करणारे कलाकार नव्हते, तर ते स्वतः तंबो-यावर प्रेम करणारे हाडाचे कलाकार होते. कलाकाराच्या पाठीमागे बसून साथसंगत करतांना कलाकाराच्या गायनाची तन्मयतेने होणारी त्यांची एकरुपता त्यांच्या चेह-यावरुन श्रोत्यांना देखील जाणवायची. त्यांची प्रचंड गुंतवणूक होती. विनय चित्राव हे संवंदनशील व्यक्तिमत्व होते. एवढेच नव्हे तर महिलांविषयी त्यांच्या मनत प्रचंड सन्मान होता. त्यांच्या मैत्रीचा परिघ बराच मोठा होता.

हार्मोनियम वादक मिलिंद कुलकर्णी म्हणाले की, एखाद्या व्यक्तीचे मित्र कोणकोणते आहेत, यावरुन त्यांची श्रीमंती ठरत असते. विनय चित्राव माझ्या मित्र परिवारात असल्याने मी स्वतःला खूप श्रीमंत मानत होतो परंतू विनय चित्रावच्या निधनाने मी आज गरीब झालो आहे. त्याच्या सर्व क्षेत्रात प्रचंड ओळखी होत्या. परंतू, त्या ओळखींचा कोणत्याही नात्यात त्यांनी बडेजावपणा केला नाही. सतत दुस-यांच्या मदतीला धावून जायचा त्याचा स्वभाव होता. तो माझ्याकडून हार्मोनियम शिकला त्या अर्थाने तो मला गुरुस्थानी मानायचा आणि प्रत्येक गुरुपौर्णीमेला तो मला न चुकता फोन करायचा. माझ्याकडून मी गुरु-शिष्य असे नाते कधीच मानले नाही, कारण तो माझा सच्चा मित्र होता.

रघुनंदन पणशीकरांचे शिष्य साैरभ काडगांवकर म्हणाले की, मी आज जो कोणी आहे, तो केवळ विनय चित्राव मुळेच. सर्वच क्षेत्रात त्याच्या प्रचंड ओळखी होत्या. रघुनंदन दादांकडे माझ्यासाठी विनय चित्राव यांनीच शब्द टाकल्यामुळे मला रघुनंदन दादांसारखा गुरु मिळाला. हे केवळ विनय चित्राव
यांच्यामुळेच शक्य झाले.विनयचा स्वभाव शिस्तप्रिय तसाच थोडा मिश्किलही होता. गांधर्व महाविद्यालामुळे आमचा एकमेकांशी खूप घनिष्ठ संबंध निर्माण झाला होता.

प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना डाॅ. माधुरी आपटे म्हणाल्या की, नृत्यवेध संस्थेच्या माध्यमातून आमची मैत्री खुलत गेली. कधीही तत्परतेने तो मदतीला उभा रहायचा, मदतीला धावून यायचा. माणुसकीचे उत्तम उदाहरण प्रस्थापीत करुन आणि आमच्याही आयुष्यात सुरेलपणा निर्माण करुन विनय चित्राव आपल्यातून निघून गेला.

भाजप महाराष्ट्र पश्चिम आणि उत्तर विभागाचे संघटक रवी अनासपुरे म्हणाले की, विनय चित्रावच्या वागण्यात खूप सहजता होती. सहजता ही त्याच्या वागण्या-बोलण्याची शैलीच होती. संघ, संगीत, भारतीय जनता पक्ष या तीन्ही आघाड्यांवर तो सहजतेने वावरायचा. आम्ही देखील ज्या अधिका-यांपर्यंत पोहचतांना कचरायचो त्या सर्व पदाधिका-यांपर्यंत हा सहज पोहचायचा.

नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे म्हणाल्या की, विनय चित्राव म्हणजे अजात शत्रू असे व्यक्तिमत्व होते. सर्वांना धरुन चालणे हे त्याचे स्वभाव वैशिष्ट्य होते. सांस्कृतीक क्षेत्रात सर्व दिग्गजांच्या घरी त्याचा सहज वावर होता. संगीताचार्यांपासून ते सर्व मित्रांपर्यंत सर्वांचे वाढदिवस आवर्जून लक्षात ठेऊन त्यांना आठवणीने फोन करणे हा त्याचा नित्यनियम होता. तो माझ्याकडे अनेक प्रकारची कामे घेऊन आला. पंरतू, त्या सर्वांत त्यांने स्वतः करता नव्हे तर सातत्याने दुस-यांची काम कशी होतील यावरच भर दिला. पदवीधर मतदार संघ फार्म भरून घेणे हे तसे जटील काम पंरतू विनयने चिकाटीने मोठ्या संख्येने ते फार्म स्वतः भरून आणले. दिग्गजांबरोबरचे फोटो हा त्याचा फार मोठा खजीना होता.

गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद मराठे म्हणाले की, महाविद्यालयावर त्याचे घरासारखे प्रेम होते. नियामक मंडळा पासून तर कार्यालयीन कर्मचा-यांपर्यंत सर्वांनाच विनयच्या निधनामुळे धक्का बसला. स्वर आणि चवीवर विनय प्रचंड प्रेम करणारा होता. विद्यालयाच्या नियमीत बैठकींनतर भोजनाचे नियोजन असायचे, त्याची जबाबदारी विनय आत्मियतेने पार पाडायचा. त्याच्या निधनानंतर अनेक दिग्गजांचे मला व्यक्तिशः सांत्वनाचे फोन आले, यावरुनच विनय मी आणि गांधर्व महाविद्यालय एेकमेकांशी किती एकरुप होते हेच सिद्ध होतॆ.

ज्योत्सा सरदेशपांडे म्हणाल्या की, विनय हा नावाप्रमाणे विनयशील होता. प्रत्येकाला योग्य तो मान द्यायचा. समर्पण, बांधिलकी आणि प्रश्नांची जाण हे त्याच्यातील गुण होते. संगीत क्षेत्रात त्याने फार मोठे काम केले आहे. गुरू पौर्णिमेला तो आवर्जुन भेटायला यायचा. कोणाच्याही मदतीला तत्परतेने धावून जाणे आणि घेतलेली जबाबदारी पार पाडणे, हे त्याचे गुणवैशिष्ट्य होते.

विनय चित्राव यांचे स्नेही वरूण पालकर म्हणाले की, उत्तम खायचे आणि उत्तम खाऊ घालायचे, हे त्याचे स्वभाव वैशिष्ट्य होते. वैशाली कट्टयावर आमच्या नेहमी गप्पांच्या मैफली व्हायच्या. राम मंदिराचा निकाल, भूमीपूजन यासारख्या सकारात्मक घडामोडींवर श्रीरामचा छाप असलेला पेढा तो आवर्जुन वाटायचा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भीमसेन जोशी महोत्सव, भारतीय जनता पक्ष या सर्व स्तरांवर त्याचा लिलया वावर असायचा. पक्षासाठी तर त्याने अनेकदा पदरमोड करून कार्य सिद्धीस नेल्याचा मी स्वतः साक्षीदार आहे.

यावेळी पुणे मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, आशय परिवाराचे आजीव सदस्य राजकुमार सुराणा, वन्यजीव अभ्यासक स्वप्नील कुंभोजकर, अल्पना तळेगांवकर, विशाखा जोशी यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading