पतित पावन संघटना व शाह गॅस एजन्सीतर्फे रक्तदान शिबिर
पुणे : पतित पावन संघटना व शाह गॅस एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १६८ रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. शिबीरात ११७ पिशव्या रक्ताचे संकलन करुन सूर्या ब्लड बँकेला देण्यात आले. दिप बंगला चौक, शिवाजीनगर येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले.
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉपोर्रेशन एलपीजी सेल्सच्या अधिकारी चित्रा नायर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पतित पावन संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, सिताराम खाडे, पुणे शहराचे धनजंय क्षीरसागर,संतोष शेंडगे, स्वप्नील नाईक, गुरु कोळी, विक्रम मराठे, सुरेश खोले यांच्यासह सचिन धुमाळ, सुधीर धुमाळ,अमोल मुकेरकर, मनोज कूळधरणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तदान शिबिराचे आयोजन विजय गावडे व पराग शाह यांनी केले.
स्वप्नील नाईक म्हणाले, कोरोना संसर्गजन्य महामारीत पुण्यातील कोणत्याही रुग्णास रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जबाबदारीचे भान ठेवीत तब्बल १६८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यापुढेही कोरोनाकाळात असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
