fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRAPUNE

डॉ. विजय भटकर यांना ‘सूर्यदत्ता शंतनुराव किर्लोस्कर आत्मनिर्भर राष्ट्रीय पुरस्कार-२०२१’ जाहीर

पुणे : प्रसिद्ध संगणकशास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना ‘सूर्यदत्ता शंतनुराव किर्लोस्कर आत्मनिर्भर राष्ट्रीय पुरस्कार-२०२१’ जाहीर झाला आहे. व्यापार व उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणारे उद्योजक व किर्लोस्कर समूहाचे संचालक दिवंगत पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर यांच्या २७ व्या पुण्यतिथीनिमित्त सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने हा पुरस्कार डॉ. विजय भटकर यांना जाहीर करण्यात आला. उद्या सोमवार, दि. २६ एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ वाजता बावधन येथील डॉ. भटकर यांच्या कार्यालयात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी दिली.


“किर्लोस्कर उद्योग समूहाच्या माध्यमातून भारताला एक वेगळी ओळख देणाऱ्या शंतनुराव किर्लोस्कर यांच्या स्मृतीनिमित्त हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येणार आहे. यंदाचा हा पहिला पुरस्कार भारताला पहिला महासंगणक देत आत्मनिर्भर बनवणाऱ्या डॉ. विजय भटकर यांना देण्यात येणार आहे. अमेरिकेतील क्लिंटन प्रशासनाने भारताला महासंगणक  देण्यास नकार दिला त्यावेळी माहिती तंत्रज्ञानात आपली पीछेहाट होणार अशी चिन्हे असताना डॉ. विजय भटकर यांच्या प्रयत्नांमुळे ‘परम’ महासंगणक तयार झाला. नंतर भारताने हा महासंगणक रशिया, सिंगापूर, जर्मनी व कॅनडा यासारख्या प्रगत देशांना निर्यातही केला, त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची स्वयंपूर्णता सिद्ध झाली. त्यांचा सन्मान हा आमचा सन्मान आहे,” असे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले.


प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “डॉ. भटकर यांनी १९९०च्या दशकात सी-डॅक या संस्थेतर्फे ‘परम’ तयार करण्याचे आव्हान स्वीकारले. परम ८००० व परम १०००० असे दोन प्रगत महासंगणक त्यांच्या प्रयत्नातून साकार झाले. ‘सी-डॅक’च्या ‘जिस्ट’ या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दहा लिप्यांमधील १६ प्रमुख भाषा संगणकावर आणून ज्ञानकोषीय तूट त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भरून काढली. सी-डॅकच्या माध्यमातून त्यांनी पाच हजाराहून अधिक सॉफ्टवेअर व्यावसायिक घडवले. आयस्क्वेअरआयटी, एमकेसीएल या संस्थांच्या पायाभरणीतही त्यांनी मोठी भूमिका पार पाडली. भारतातील सर्वोत्तम मानले जाणारे केरळ इन्फोटेक पार्क (त्रिवेंद्रम) उभे करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ‘एज्युकेशन टू होम’ हा कार्यक्रमही त्यांनी प्रभावीपणे राबवला. गेल्या पंचवीस वर्षांत ज्यांनी भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाला आकार दिला. त्यात डॉ. भटकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. विचारवंत, नेतृत्वगुण असलेला वैज्ञानिक, संशोधक, शिक्षणतज्ञ, लेखक, धोरणकर्ते म्हणून ते देशाला परिचित आहेत.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading