‘रोलबॉल चॅम्पियनशिप’मध्ये ‘सूर्यदत्ता’च्या मिहीर गणेशवाडेला सुवर्णपदक
पुणे : महाराष्ट्र स्टेट रोल बॉल असोसिएशनतर्फे नुकत्याच झारखंड येथे झालेल्या १७ व्या सिनियर रोल बॉल चॅम्पियनशिप-२०२१ स्पर्धेत सूर्यदत्ता कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, इन्फर्मेशन अँड टेक्नॉलॉजीमध्ये (एससीएमआयआरटी) बीकॉमच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या मिहीर गणेशवाडेने सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेतील यशासह मिहीर नॅशनल रोल बॉल चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरला आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, प्राचार्य डॉ. अब्बास लोखंडवाला, उपप्राचार्या डॉ. विजयालक्ष्मी राव यांनी मिहीरच्या यशाचे कौतुक केले व त्याला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. मिहिरने ‘सूर्यदत्ता’कडून मिळत असलेल्या पाठिंबा आणि प्रोत्साहनाबद्दल आभार मानले.
“क्रीडा क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी आहेत. विद्यार्थ्यांनी स्पोर्ट आंत्रप्रेन्युअरशिपला प्राधान्य द्यावे. क्रीडा प्रशिक्षक, अकॅडमी, क्रीडा संशोधन असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. बरेच विद्यार्थी राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचतात. पण मध्येच अपयश आले, तर निराश होऊन पुन्हा नोकरीकडे वळतात. अलीकडच्या काळात शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्याला फार महत्व आले आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातील पॅशन न सोडता विद्यार्थी त्याच क्षेत्रात करिअर विकसित करायला हवे. विविध क्रीडाप्रकारात संशोधन करून त्यातून क्रीडा क्षेत्रात व्यवसायाभिमुख करिअर घडवावे. अशा गोष्टींसाठी ‘सूर्यदत्ता’ कायमच प्रोत्साहन देते.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्ता कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (एससीएमआयआरटी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न, तसेच महाराष्ट्र सरकारकडून मान्यताप्राप्त आहे. महाविद्यालयाकडून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. यात बीबीए, बीबीए-आयबी, बीबीए-सीए, बीएस्सी (ॲनिमेशन), बीएस्सी (सीएस), एमकॉम आणि एमएस्सी (सीएस) आदी पदव्यांचा समावेश आहे. भारतात प्रथमच बीएस्सी इन सायबर अँड डिजिटल सायन्स हा अभ्यासक्रम सुरु करणारी सूर्यदत्ता संस्था आहे.”
‘एससीएमआयआरटी’कडून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख, कौशल्याभिमुख बनवण्यासाठी उद्योग जगताशी संपर्क आणि ज्ञान व्यवस्थापन उपक्रम राबवले जातात. त्यातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमेतर उपक्रम, संवादकौशल्य,सादरीकरण, क्रीडा, कला-नाट्य, योग अशा विविध गोष्टी साध्य करता येतात, असेही प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.
