भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे ‘वसंत नाट्य यज्ञ’

पुणे : सिद्धहस्त नाट्यलेखक प्रा. वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘वसंत नाट्य यज्ञ’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणेतर्फे करण्यात आले आहे. दि. 20 व 21 मार्च 2021 रोजी प्रा. कानेटकर यांच्या 41 नाटकांतील प्रत्येकी एका प्रवेशाचे अभिवाचन केले जाणार आहे. तसेच ‘संगीत मत्स्यगंधा’ या नाटकाचा विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला असून ‘वसंतगीते’ हा प्रा. कानेटकर यांच्या संगीत नाटकातील गाण्यांच्या कार्यक्रमाची पर्वणी रसिकांना मिळणार आहे.

दि. 20 मार्च 1922 हा प्रा. कानेटकर यांचा जन्मदिन. जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभानिमित्ताने प्रा. कानेटकर यांच्या स्मृती जागविण्यासाठी ‘वसंत नाट्य यज्ञ’ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भरत नाट्य संशोधन मंदिराचे विश्वस्त रवींद्र खरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष आनंद पानसे, कार्याध्यक्ष अभय जबडे आणि गायक-अभिनेते संजीव मेहेंदळे या प्रसंगी उपस्थित होते. दोन दिवसीय वसंत नाट्य यज्ञ हा कार्यक्रम भरत नाट्य संशोधन मंदिरात होणार आहे. अभिवाचन कार्यक्रमाचे भरत नाट्य संशोधन मंदिराच्या यू ट्यूब चॅनलवरून थेट प्रसारण केले जाणार आहे.


प्रा. कानेटकर यांनी ‘मत्स्यगंधा’, ‘लेकुरे उदंड जाहली’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘हिमालयाची सावली’ अशी वेगवेगळ्या धाटणीतील 41 व्यावसायिक नाटके लिहिली. या 41 नाटकांतील प्रत्येकी एक प्रवेश वसंत नाट्य यज्ञात वाचला जाणार आहे. शनिवार, दि. 20 रोजी सकाळी 10 वाजता कानेटकर यांच्या नाट्यसंहितांचे पूजन केले जाणार असून ‘वेड्याचे घर उन्हात’ या त्यांच्या पहिल्या नाटकातील प्रवेश वाचनाने नाट्य अभिवाचन यज्ञाचा शुभारंभ होणार आहे. हा कार्यक्रम दुपारी 2 वाजेपर्यंत चालेल. याच दिवशी सायंकाळी 4 ते 8 या वेळात ‘संगीत मत्स्यगंधा’ या सुप्रसिद्ध नाटकाचा प्रयोग होणार आहे. यात चारूदत्त आफळे, गौरी पाटील आणि रवींद्र खरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
रविवार, दि. 21 रोजी सकाळी 9.30 वाजता ‘देवाचे मनोराज्य’ या नाटकातील प्रवेश अभिवाचनाने दुसर्‍या दिवशीच्या नाट्य यज्ञाला प्रारंभ होणार असून दुपारी 4 वाजता या यज्ञाची सांगता होईल. सायंकाळी 5 वाजता प्रा. कानेटकर यांच्या संगीत नाटकांतील गाण्यांचा ‘वसंतगीते’ हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात सादर होणार्‍या सर्व नाट्यगीतांना पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेले आहे. संजीव मेहेंदळे, मेघन श्रीखंडे, विश्वजित मेस्त्री, गौरी पाटील हे कलाकार वसंतगीते सादर करणार आहेत. पाहुणे कलाकार म्हणून पंडित शौनक अभिषेकी या कार्यक्रमात सहभागी होणार असून ते काही नाट्यपदे सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ समीक्षक, लेखक, पत्रकार विजय कुवळेकर भूषविणार असून प्रा. वसंत कानेटकर यांच्या सूनबाई अ‍ॅड. अंजली कानेटकर व नातू अंशुमन कानेटकर हेही या प्रसंगी आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
वसंत नाट्य यज्ञात नवोदितांपासून ज्येष्ठांपर्यंत हौशी कलाकारांचा तसेच रोटरी क्लबच्या सभासदांचा सक्रिय सहभाग असणार आहे. नाट्यअभिवाचन यज्ञ सर्वांसाठी विनामूल्य असून संगीत मत्स्यगंधा व वसंतगीते या कार्यक्रमांना प्रवेश शुल्क आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनच्या निर्देशानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: