भारतीय जैन संघटनेचे “मिशन लसीकरण”

पुणे –भारतीय जैन संघटनेचे (बीजेएस) संस्थापक शांतिलाल मुथ्था व त्यांच्या पत्नी सरला मुथ्था यांनी आज ससून रुग्णालय येथे कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता सर्वांनीच लस घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ससून रुग्णालय व बी. जे. मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. मुरलीधर तांबे स्वतः लसीकरणाच्यावेळी हजर होते. यानंतर शांतिलाल मुथ्था व डॉ. तांबे यांची कोरोना लसीकरण व्यवस्थापन संदर्भात सविस्तर चर्चा झाली. लसीकरण केंद्रावर होणारी तुडुंब गर्दी रोखण्यासाठी व त्यांना योग्य ते मार्गदर्शन होण्यासाठी बीजेएसच्या माध्यमाने “मिशन लसीकरण” सुरु करण्यात आले आहे.

या माध्यमाने ससून रुग्णालय पुणे येथे बीजेएस, फोर्स मोटर्स व पुणे महानगर पालिका यांच्या वतीने एका स्वागत कक्षाची उभारणी करण्यात येत आहे. या स्वागत कक्षामध्ये लाउड स्पीकरद्वारे सर्वांना लसीकरणासंदर्भात माहिती देऊन त्यांची कागदपत्रे तपासली जातील. योग्य ते मार्गदर्शन केल्यामुळे नोंदणीनुसार त्या त्या वेळेस लसीकरण प्रक्रियेसाठी सुविधा होईल व विनाकारण थांबण्यास लागणार नाही अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे.

तसेच संपूर्ण पुणे शहरात लस घेणाऱ्या व्यक्तीला Step one टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने त्यांच्या तब्ब्येतीची विचारपूस करून लसीकरणानंतरचा पाठपुरावा करण्यात येईल. ससून रुग्णालयामध्ये हे स्वागत कक्ष उद्यापासून सुरु होणार असून लवकरच खाजगी रुग्णालये व इतर शासकीय रुग्णालयांमध्ये हे कार्य सुरु करण्याचा बीजेएसचा मानस आहे. गेल्या मार्चपासून कोरोनाच्या संपूर्ण काळामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी मोबाईल डिस्पेन्सरी सेवा, मिशन झिरो, स्वॅब सेंटर, कोविड केअर सेंटर, रक्तदान शिबिरे, थर्मल स्क्रीनिंग अशी विविध कार्ये बीजेएस सलगपणे करीत आलीच आहे. लसीकरणाच्या मोहीमेमध्येही बीजेएस शासनाला मदत करण्यास सज्ज आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: