सतार, बासरीवादनाने वाढली वसंतोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची रंगत

पुणे, दि. २० – डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय वसंतोत्सवाचा आजचा दुसरा दिवस सतार आणि बासरीवादनाने रंगला. कार्यक्रमाची सुरूवात इटावा घराण्याचे युवा सतारवादक शाकीर खाँ यांच्या सतारवादनाने झाली. स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा मंच येथे सुरू असलेल्या वसंतोत्सवाचे हे १४ वे वर्ष आहे.

एकाच शाळेतील मित्र असलेल्या राहुल देशपांडे यांनी आयोजित केलेल्या वसंतोत्सवामध्ये कला सादर करण्याची मिळालेली संधी ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, असे शाकीर खाँ या वेळी म्हणाले. त्यांनी राग किरवानी सादर केला. यामध्ये त्यांनी आलाप, जोड, झाला, विलंबित झपताल आणि तीन ताल मध्यलय सादर केली. त्यांना मुकेश जाधव यांनी तबला तर कस्तुरी आंभोरकर यांनी तानपुरा साथ केली.

यानंतर शास्त्रीय गायक पं. विजय कोपरकर यांनी राग धानी सादर केला.  यामध्ये त्यांनी  बडा ख्याल, ताल झुमरामध्ये ‘बमना रे…’ , धृत बंदिश ‘लंगर वा छांड मोरी बैंया…’ आणि ‘सखी मोरी सरसे ठरक गयी डगरी…’ही अतिधृत बंदिश सादर केली. यानंतर राग दिन की पुरीया मध्ये त्यांनी ‘कैसे हे नि की धाम…’ ही रचना प्रस्तुत केली. ‘शतजन्म शोधिताना’ या नाट्यगीताने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना राहुल गोळे यांनी संवादिनी, विवेक भालेराव यांनी तबला तर तेजस कोपरकर आणि ईश्वर घोरपडे यांनी तानपुरा व गायनसाथ केली.

यानंतर प्रसिद्ध बासरी वादक राकेश चौरासिया व वेणू बासरीचे मास्टर शशांक सुब्रमण्यम् यांचे एकत्रित बासरीवादन झाले. कर्नाटकी आणि हिंदुस्थानी शैलीचा सुरेल मेळ घालत या दोघांनी बासरीवादन केले. त्यांनी दोन्ही शैलीत वाजविला जाणारा राग वाचस्पती सादर केला.  कर्नाटकी शैलीतील बासरीवादनासाठी लहान आकारातील बासरी वापरली जाते, तर हिंदुस्थानी शैलीत मोठी बासरी वापरतात. यावेळी शशांक यांनी वादनासाठी दोन्ही बासरींचा वापर कृत वादन केले.  हिंदुस्थानी आणि कर्नाटकी बासरीवादनाची अनुभूती या दोघांनी उपस्थितांना दिली, रसिकांनीही त्यांना भरभरून दाद दिली.या दोघांनाही पद्मश्री पं विजय घाटे यांनी तबला आणि अनंत क्रीश्रण यांनी मृदंगमवर साधसंगत केली.

Leave a Reply

%d bloggers like this: