‘आयसीएआय’ पुणे शाखेची चार पुरस्कारांवर मोहोर


पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेने २०२० मधील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील दोन आणि विभागीय स्तरावरील (वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल – डब्ल्यूआयआरसी) दोन पुरस्कार अशा एकूण चार पुरस्कारांवर मोहोर उमटवली. राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम शाखा व सर्वोत्तम विद्यार्थी (वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन- विकासा) शाखेचा द्वितीय, तर विभागीय स्तरावर प्रथम पुरस्कार आयसीएआयच्या पुणे शाखेला मिळाला.

नुकत्याच झालेल्या वार्षिक समारंभात राज्यसभा खासदार सीए अरुण सिंग व ‘आयसीएआय’चे अध्यक्ष सीए अतुलकुमार गुप्ता, माजी अध्यक्ष सीए प्रफुल्ल छाजेड यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले. आयसीएआय पुणे शाखेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे (२०२०-२१), ‘विकासा पुणे’चे अध्यक्ष सीए समीर लड्डा, सचिव-खजिनदार सीए काशिनाथ पठारे यांनी हे चारही पुरस्कार स्वीकारले. यावेळी ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, ‘डब्ल्यूआयआरसी’चे अध्यक्ष सीए ललित बजाज, खजिनदार सीए आनंद जाखोटिया, विभागीय समितीचे सदस्य यशवंत कासार आदी उपस्थित होते.
दरवर्षी संस्थेच्या राष्ट्रीय व विभागीय कार्यालयातून सर्वोत्तम शाखेचे, तसेच विद्यार्थी शाखेचे पुरस्कार दिले जातात. राष्ट्रीय स्तरावरील शाखांमध्ये पुणे शाखेने आणि ‘विकासा’ या विद्यार्थी शाखेने पात्रतेच्या निकषांप्रमाणे काम करत हे पुरस्कार प्राप्त केले. आयसीएआय पुणे शाखेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे (२०२०-२१), ‘विकासा पुणे’चे अध्यक्ष सीए समीर लड्डा, सचिव-खजिनदार सीए काशिनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली मिळाली आहेत.


सीए अभिषेक धामणे म्हणाले, “वर्षभर आयसीएआय पुणे शाखेने ‘३आय’ अर्थात इमेज (प्रतिमा), इंटलेक्ट (बुद्धिमत्ता) आणि इन्फ्रास्ट्रक्चर(पायाभूत सुविधा) या संकल्पनेवर काम केले. विविध कार्यशाळा, मार्गदर्शन सत्रे, राष्ट्रीय परिषदा, सामाजिक उपक्रम, सनदी लेखापालांसाठी कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये अनेकांचे सहकार्य, मार्गदर्शन व विश्वास लाभला. त्याबद्दल सर्वांचे आभार मानून हे पुरस्कार ‘आयसीएआय’ पुणे शाखामधील सर्व सदस्य, विद्यार्थी आणि कष्टकरी कर्मचाऱ्यांना समर्पित करतो.”

सीए समीर लड्डा म्हणाले, “पुणे ‘विकासा’ अंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना नवनवे कौशल्य, तंत्र, अभ्यासाचे मंत्र देणारे कार्यक्रम संस्थेमार्फत राबविण्यात आले. सर्व सहकाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे यामध्ये मौलिक सहकार्य लाभले.”

Leave a Reply

%d bloggers like this: