सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कार्याचा इतिहास पुढे यायला हवा – आमदार दिलीप मोहिते पाटील

पुणे, दि. १८ – छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचे आणि मोहिते घराण्याचे नातेसंबंध शेवटपर्यंत टिकून होते हे इतिहासात दिसून येते. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची प्रेरणा आणि त्यांचे कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचायला हवे. त्याकरिता मोहिते घराण्याचा संकलित केलेला इतिहास पुढे आला पाहिजे. हंबीरराव मोहिते यांचा आणि त्यांच्या कार्याचा इतिहास पुढे आला तर या इतिहासातून तरुणांना स्फूर्ती मिळेल, असे मत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.

मोहिते परिवाराच्या वतीने शिवजयंती महोत्सवानिमित्त शिवाजीनगर येथील श्री रोकडोबा देवस्थान सभागृहात मदतीनिधी प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कै. विकास मोहिते यांचा मुलगा ज्ञानेश मोहिते यास मोहिते कुटुंबियांच्या वतीने १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करुन शैक्षणिक मदत देण्यात आली. यावेळी इतिहास अभ्यासक विक्रमसिंह मोहिते, अ‍ॅड. सुभाष मोहिते, शिवजयंती महोत्सव समितीचे आद्य प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, अविनाश मोहिते, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन संदीप मोहिते, दत्ता मोहिते, अ‍ॅड.परिक्षीत मोहिते, अ‍ॅड.प्रशांत मोहिते, सुरेश मोहिते, राजेंद्र मोहिते यांनी केले.  

विक्रमसिंह मोहिते म्हणाले, स्वत:ला काही मिळेल याची अपेक्षा न बाळगता स्वराज्य निर्मितीसाठी हंबीरराव मोहिते यांचे मोठे योगदान आहे. मोहिते घराण्याचे कर्तुत्व हे फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राबाहेरही दिसून येते. अ‍ॅड. सुभाष मोहिते म्हणाले, आडनावाचा इतिहास हा प्रत्येकाला असतो, परंतु आडनावाबरोबर कर्तृत्वाचा वारसा  देखील पुढे चालवला पाहिजे. चांगले काम करण्यासाठी आपण एकत्र येत नाही ही खंत आहे. परंतु समाजात अनेक कर्तृत्ववान व्यक्ती आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी  व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आपण नक्कीच एकत्र आले पाहिजे. अमित गायकवाड म्हणाले, शिवजयंतीनिमित्त तब्बल १०० स्वराज्यरथांचा सहभाग उत्सवात सुरू केला. उत्सवातून लोक एकत्र येतील आणि कर्तृत्ववान व्यक्तींचा इतिहास त्यांच्या समोर येईल. या इतिहासातून त्यांना स्फूर्ती आणि प्रेरणा मिळेल हा उद्देश आहे. मोहिते घराणे म्हणजे पराक्रम, त्याग, समर्पण, स्वराज्यनिष्ठा, खंबीर आधार, स्वार्थ नव्हे परमार्थ असे आहे.

शिरीष मोहिते म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  शिवजयंती  उत्सवाचे शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नावाचा वारसा घेऊन पुढे जाणारे अनेक आहेत. परंतु त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा पुढे घेऊन जातो तो खरा वंशज. सरसेनापती हंबीरराव मोहिते  यांच्या कर्तृत्वाचा वारसा पुढे नेण्यासाठी मोहिते परिवार नेहमी तत्पर असेल, असेही त्यांनी सांगितले. विक्रांत मोहिते यांनी  सूत्रसंचालन केले. शिरीष मोहिते यांनी प्रास्ताविक केले. अविनाश मोहिते यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: