ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य – चंद्रकांत पाटील

पुणे, दि. १८ – ब्राह्मण समाजाकडून मला नेहमीच प्रेम मिळालं आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजावर अन्याय करणारा मी माणूस नाही. ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी माझं नेहमीच सहकार्य असते, त्यामुळे समाजाचे प्रश्न, मागण्या यासाठी मी नेहमी पाठपुरावा करेन, असं आश्वासन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.

ब्राह्मण महासंघाच्या वतीने आयोजित एका अनौपचारिक कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपचे नगरसेवक अजय खेडेकर, आदींसह ब्राह्मण महासंघाचे राज्याच्या विविध भागातील पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, ब्राह्मण समाजाकडून मला नेहमीच प्रेम मिळालं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना परिषदेचे संस्थापक बाळ आपटे आणि यशवंतराव केळकर यांच्या कुटुंबाचा मला नेहमीच स्नेह मिळाला. त्यामुळे ब्राह्मण समाजावर मी कधीही अन्याय केलेला नाही. समाजाच्या विकासासाठी माझे नेहमीच योगदान राहिले आहे. भाजपा सरकारच्या काळात ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी कोल्हापूरमध्ये अनेक उपक्रम सुरु केले. असेच, उपक्रम पुण्यातही सुरु करण्यासाठी माझे नेहमीच सहकार्य राहिल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

पाटील पुढे म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अमृत नावाने महामंडळ सुरु करणे प्रस्तावित होते. त्यासाठी महामंडळाचे नाव देखील रजिस्टर झाले होते. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्याने महामंडळाचे प्रस्ताव बारगळला. आगामी काळात राज्यात भाजपाचे सरकार आल्यास, या महामंडळासाठी प्रयत्न करु, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.ब्राह्मण समाजाचे राज्यव्यापी संघटन उभे करण्याचे महत्त्वाचे कार्य आनंद दवे व त्यांचे सर्व सहकारी करत असून याद्वारे ब्राह्मण समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होइल.संघटनेच्या बांधणी संदर्भात पाटील म्हणाले की, संघटन ही एक ताकद आहे. संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपले कान पितळाचे ठेवू नयेत. यातून संघटनेत सौहार्दाचे वातावरण राहते‌. त्यामुळे सर्वांनी एकदिलाने काम करावे व प्रश्न मार्गी लावावेत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

%d bloggers like this: