देवा झिंजाड, डॉ. संतोष जाधव, डॉ. द. ता. भोसले, चंद्रमोहन कुलकर्णी, शेखर देशमुख, अंजली ढमाळ यांना मसापचे पुरस्कार

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या वतीने, मानाचे साहित्य पुरस्कार कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिवशी अर्थात मराठी राजभाषा दिनी दिले जातात. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते. हे सर्व पुरस्कार शनिवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ४. ०० वाजता, ज्येष्ठ लेखिका मंगला आठलेकर यांच्या हस्ते आणि मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात येणार आहेत. परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती कार्यवाह बंडा जोशी यांनी दिली.

कॉंटिनेंटल प्रकाशन पुरस्कृत, कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार  कवी देवा झिंजाड (पुणे) यांच्या ‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ या कवितासंग्रहाला दिला जाणार आहे. हा संग्रह प्रकाशित करणाऱ्या, हार्मिस प्रकाशन पुणेच्या प्रिया सुशील धसकटे यांनाही पुरस्कार दिला जाणार आहे. डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी आणि कवी जयंत भिडे यांच्या निवड समितीने, या कवितासंग्रहाची पुरस्कारासाठी निवड केली.

 कै. द. वा. पोतदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, इतिहास विषयक ग्रंथाला, दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी, डॉ. संतोष जाधव (सोलापूर) यांच्या ‘आंबेगाव तालुक्याचा इतिहास’ या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. मंदार लवाटे आणि डॉ. सचिन पवार यांच्या निवड समितीने या ग्रंथाची पुरस्कारासाठी निवड केली.

प्रख्यात समीक्षक कै. रा. श्री. जोग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, समीक्षा ग्रंथाला, दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी, डॉ. द. ता. भोसले, (पंढरपूर) यांच्या ‘एक कवी एक कविता’ या समीक्षा ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. ग्रंथाचे प्रकाशक म्हणून मधुराज पब्लिकेशन, पुणे यांनाही हा पुरस्कार दिला जाणार आहे. डॉ. अविनाश सांगोलेकर आणि डॉ. रुपाली शिंदे यांच्या निवड समितीने या ग्रंथाची पुरस्कारासाठी निवड केली आहे.

सामाजिक / सांस्कृतिक / वैचारिक / ऐतिहासिक ग्रंथाला  दिल्या जाणाऱ्या कै. शं. ना. जोशी स्मृती पुरस्कारासाठी, शेखर देशमुख (मुंबई) यांच्या ‘उपरे विश्व’ या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. डॉ. वैभव ढमाळ आणि डॉ. तुकाराम रोंगटे यांच्या निवड समितीने या ग्रंथाची पुरस्कारासाठी निवड केली आहे.

नवोदित कवीच्या पहिल्या काव्यसंग्रहाला दिल्या जाणाऱ्या कै. सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कारासाठी, कवयित्री अंजली ढमाळ (सातारा) यांच्या ‘ज्याचा-त्याचा चांदवा’  या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. डॉ. वर्षा तोडमल आणि ज्योत्स्ना चांदगुडे यांच्या निवड समितीने, या पुरस्कारासाठी ग्रंथाची निवड केली आहे.

 या वर्षीपासून उत्कृष्ट ललित लेखनासाठी कै. निर्मला मोने स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. यावर्षीच्या पुरस्कारासाठी  चंद्रमोहन कुलकर्णी (पुणे) यांच्या ‘बिटवीन द लाईन्स’ ललित लेखसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. अभिजित थिटे आणि श्रीपाद ब्रम्हे यांच्या निवड समितीने या ललित संग्रहाची निवड केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: