मसापच्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर

‘आंतरभारती’, ‘ऋतुरंग’, ‘चपराक’, ‘महाराष्ट्र नामा’, ‘छावा’ आणि ‘सायबर साक्षर’ (ऑनलाईन)  या दिवाळी अंकांना सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकांची पारितोषिके

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे अ. स. गोखले स्मृतिप्रीत्यर्थ ‘रत्नाकर पारितोषिक’ ‘आंतरभारती’ या दिवाळी अंकाला, चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत ‘विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकाला, ‘मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक’ ‘चपराक’ या दिवाळी अंकाला, ‘शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक’ ‘महाराष्ट्र नामा’ या दिवाळी अंकाला, डेलिहंट पुरस्कृत उत्कृष्ट ऑनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक ‘सायबर साक्षर’ या दिवाळी अंकाला  देण्यात येणार आहे. ‘जानकीबाई केळकर’ स्मृतिप्रीत्यर्थ ‘उत्कृष्ट बालवाङ्मयदिवाळी अंकाचे पारितोषिक’ ‘छावा’ या दिवाळी अंकाला तसेच दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे ‘दि. अ. सोनटक्के पारितोषिक’ ‘साहित्यदीप’ या दिवाळी अंकातील डॉ. भारती पांडे यांच्या ‘प्रेम सेवा शरण’ या कथेला जाहीर करण्यात आले आहे. तसेच उत्कृष्ट ललित लेखासाठीचे ‘अनंत काणेकर पारितोषिक’ ‘साप्ताहिक सकाळ’ या दिवाळी अंकातील आदिती पटवर्धन यांच्या ‘विलक्षण ब्रम्हपुत्र’ या लेखाला जाहीर करण्यात आले आहे. विविध विषयांना वाहिलेले दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित करणाऱ्या ‘छंद’ या दिवाळी अंकाचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार दि. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वा. साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात बालभारतीचे संचालक दिनकर पाटील यांच्या हस्ते व ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

प्रा. जोशी म्हणाले, ‘दिवाळी अंकाना ११२ वर्षाची गौरवशाली परंपरा आहे. दिवाळी अंक हा दीपोत्सवाच्या साक्षीने साजरा होणारा शब्दोत्सव आहे. मराठी भाषेची ही वैभवशाली परंपरा जपण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे गेली ५३ वर्ष दिवाळी अंक स्पर्धा घेतली जाते. दर्जेदार दिवाळी अंकांचा सन्मान व्हावा तसेच नव्या दमाच्या आणि कसदार लेखन करणाऱ्या लेखकांना प्रोत्साहन मिळावे, या भूमिकेतून ही स्पर्धा आयोजित केली जाते.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून ८४ दिवाळी अंक आले होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. गणेश राऊत, प्रभा सोनावणे आणि मृणालिनी कानिटकर यांनी काम पाहिले असे कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: