मराठा आरक्षण : छावा मराठा संघटनेची बैठक संपन्न 

संघटनेचा विस्तार सुरूच; रायगड जिल्ह्यासाठी पदाधिकारी नियुक्त 

पिंपरी, दि. १० – मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी छावा मराठा संघटना केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करीत आहेेेच; राज्य पातळीवरही संघटना दबाव गट म्हणून काम करीत आहे. यापुढे मराठा आरक्षणा संदर्भातील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला आहे, अशी माहिती छावा मराठा संघटनेचे संस्थापक व मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक किशोर चव्हाण आणि संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी दिली.            

छावा मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सांगवी येथे नुकतीच पार पडली. तसेच बैठकीत रायगड जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, वारंगी विभागीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांना पदनियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये रायगड जिल्हाध्यक्षपदी दिनेश पवार, उपाध्यक्षपदी रमेश जाधव, महाड तालुका उपाध्यक्षपदी शरद देशमुख, वारंगी विभागीय अध्यक्षपदी विकित कांबळेकर, उपाध्यक्षपदी सागर सुतार, सदस्यपदी गणेश कांबळेकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी पुणे शहर संपर्क प्रमुख सचिन गवांडे, पुणे शहराध्यक्ष गणेश कोतवाल, अतुल निकम, गणेश सोनवणे, संदीप नरबेकर, संदीप गबाले, राजेश हेंद्रे आदी उपस्थित होते.          

या आयोजित बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनाबाबत संघटनेच्या भूमिकेविषयी चर्चा करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना छावा मराठा संघटनेच्या उद्दिष्टांविषयी माहिती देत रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी आता 8, 9 आणि 10 मार्चला होणार आहे. यावेळी याचिकाकर्त्यांना युक्तिवाद करण्यासाठी वेळ देण्यात आला असून, 12, 15, 16 आणि 17 मार्चला राज्य सरकारला युक्तिवादासाठी वेळ देण्यात आला आहे. सरकारने आता तरी गंभीर होत पूर्ण तयारी करून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडावी. या सुनावणीकडून मराठा समाजाला आशा आहेत, असेही जाधव म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: