पं. भीमसेन जोशी यांच्या आठवणींची रंगली अनौपचारिक मैफल

–    जोशी कुटुंबियांच्या आप्तस्वकीयांनी जागविल्या आठवणी

पुणे, दि. ५ – भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला गुरुवारी सुरुवात झाली. त्यानिमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने पंडितजींच्या सानिध्यात अनेक वर्ष राहिलेल्या निकटवर्तीयांसोबत संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंडितजींच्या आठवणींना उजाळा देत भारावून टाकणाऱ्या किस्स्यांची अनौपचारिक मैफल काल शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारक येथे रंगली होती.

या मैफलीत पंडितजींचे कुटुंबीय, शिष्य, मित्र, वाहनचालक असे सर्व लोक सहभागी झाले होते. यात पंडितजींचे सुपुत्र जयंत जोशी, श्रीनिवास जोशी, कन्या शुभदा मुळगुंद, अनुराधा मुधोळकर (श्रीनिवास यांच्या मामी), मीना पोतनीस (श्रीनिवास यांच्या मावशी), लक्ष्मी जयंत जोशी (श्रीनिवास यांच्या वाहिनी), शिल्पा श्रीनिवास जोशी, आर्य संगीत प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद संगोराम, मंडळाचे विश्वस्थ मिलिंद देशपांडे, पंडितजींचे ज्येष्ठ शिष्य पं. उपेंद्र भट, आशुतोष भारद्वाज, आनंद भाटे, ज्येष्ठ टाळ वादक माउली टाकळकर, स्नेही बाळासाहेब गरुड, वाहन चालक सुरेश सारसर, पंडितजींची नातवंडे आदी उपस्थित होते. यावेळी श्रीनिवास यांनी सगळ्यांशी संवाद साधला.

पंडितजींच्या आयुष्यातील गाणं हा अविभाज्य भाग असला तरी एक माणूस, आधार, साधक, गुरु अशा विविध अंगांनी त्यांच्या व्यक्तिमत्वातील पैलू यावेळी खुले झाले. या किस्स्यांची मैफल कधी श्रोत्यांना खळखळून हसवत होती, कधी भारावून टाकत होती तर कधी डोळ्यांच्या कडादेखील पाणावणारी होती.

पंडितजींच्या पत्नी वत्सलाबाई यांची धाकटी बहिण मीना यांनी पंडितजी आपल्या घराचा आधार होता असे सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या लहानशा घरात, माणसांच्या गर्दीत कोणतीही बूज न बाळगता किंवा कोणताही मोठेपणाचा आव न आणता गायन रियाज करत असे. ते स्वतः मितभाषी असले तरी माणसांची त्यांना फार आवड असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या वडिलांच्या आठवणी सांगताना हळव्या होत शुभदा मुळगुंद म्हणाल्या, “मला कधीही बाबांनी रागवल्याचे आठवत नाही. मी त्यांची फार लाडकी होती, ते माझ्यावर रागवत नसल्याने काही काम असल्यास आई मला पुढे करत असे.” जयंत जोशी यांनी पंडितजींना असल्याला गाड्यांच्या प्रेमाच्या आठवणी सांगत त्याच्या गंमतीजंमती सांगितल्या. ते म्हणाले, “मला रेडीओ ऐकायला आवडत. पण बाबांना ते कधीच नाही आवडले. त्यांनी गाडीतील म्युझिक सिस्टीम पण काढून टाकलेली. ते बहुतेक गाण्याचा विचार करतच गाडी चालवत. मुंबईला कार्यक्रम असेल तर गाडीने जात. पोहचायला उशीर झाला तरी श्रोते वाट बघत. रात्री उशिरापर्यंत गाणं करून परत लगेच प्रवासाला लागत. त्यांना थकवा माहीतच नव्हता. गाणे झाले की ते एकदम रिचार्ज व्हायचे.”

पंडितजी सतत दौर्यावर असायचे. त्यावेळच्या आठविंना बहुतेकांनी उजाळा दिला. यावेळची एक आठवण सांगताना मिलिंद देशपांडे म्हणाले, “पंडितजी एकदा रात्रीच्या प्रवासाला निघाले होते. वाटेतून जंगल आहे, लुटारू लुटतात म्हणून पंडितजींना काहींनी सावधही केले होते. पण निघणे आवश्यक असल्याने ते निघाले व जंगलात लुटारूंनी गाडी अडवली. त्यावेळी मी कलाकार माणूस आहे, फाटका माणूस आहे. माझ्याकडे कसला माल असणार असे सांगताच त्या लुटारूने नाव विचारले. भीमसेन जोशी नाव सांगितल्यावर हे नाव रेडिओवर ऐकल्याचे त्यांना आठवले. पण विश्वास बसेना. शेवटी तेथेच जंगलात पेटी, तंबोरे लावून पंडितजींची अर्ध्या तासाची मैफल झाली. नंतर त्यांना सोडण्यात आले. शिवाय पुढच्या टोळीला कळविण्यासाठी दोन जण त्यांच्या सोबत पुढच्या वाटेवर गेले.” पंडितजींना रस्त्यांचे फार ज्ञान होते. कोठेही जायचे असले की त्या रस्त्याचे वळणे, खाणाखुणांसहित सगळी सखोल माहिती ते देत असल्याचे त्यांचे वाहनचालक सुरेश सारसर यांनी सांगितले.  

मुकुंद संगोराम म्हणाले, “मी लहान असताना पंडितजींच्या घराजवळ राहत होतो. त्यांना रोजच येता-जाता बघायला मिळायचे. त्यांच्याकडे त्यावेळी खूप मोठी गाडी होती. याचे आम्हाला कौतुक होते. त्या लहानशा रस्त्यावर घरासमोर लावलेली गाडी मोठा ट्रक आला की सारखी हलवावी लागे. परंतु तेही अगदी न कंटाळता पंडितजी करत असत. त्यांचे चारचाकी गाड्यांवर फारच प्रेम होते. नंतर त्यांनी घर बदलल्यावर आता आपल्याला पंडितजींना रोज बघायला मिळणार नाही याचे दुःख झाले होते. पण मी माझी सायकल घेऊन रोज त्यांच्या नव्या घराच्या गल्लीतून फेऱ्या मारत असे, म्हणजे कधीतरी पंडितजी दिसतील अशी आशा असे.”

आनंद भाटे म्हणाले, “मी लहान वयातच पंडीतजींच्या संपर्कात आल्याने त्याचा एक फायदा म्हणजे समोर मोठी व्यक्ती असली तरी त्याचे दडपण येत नाही. गुरुजींची स्मरणशक्ती खूप चांगली होती. शिवाय इच्छाशक्तीही दांडगी होती. त्यांच्या डोक्याची शस्त्रक्रिया झाल्यावर एवढ्या मोठ्या आजारातून उठून त्यांनी जिद्दीने परत पाहिल्यासारखाच स्वराधीराज गाजवला. त्यांचे शिष्यांवरही खूप प्रेम होते.”

Leave a Reply

%d bloggers like this: