बाबासाहेबांना खंबीरपणे साथ देणार्‍या रमाईंचे कर्तृत्व कांकणभर सरसच
– डॉ. न. म. जोशी

पुणे, दि. ५ – कृतीशिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जीवनात साथ देण्यापुरते रमाईंचे कर्तृत्व मर्यादित नाही तर जीवनातील अनंत अडचणींचा सामना करून बाबासाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणार्‍या रमाईंचे कर्तृत्व बाबासाहेबांपेक्षा कांकणभर जास्तच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी केले.

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या 124व्या जयंतीचे औचित्य साधून महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे रमाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात आज (दि. 5 फेब्रुवारी) ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. सुधाकरराव आव्हाड आणि सामाजिक कार्यकर्त्या सुनीता वाडेकर यांना रमाईरत्न पुरस्कार डॉ. जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. पंचशील शाल, रमाईंचा ग्रंथ आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. महोत्सवाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद आडकर, स्वागताध्यक्षा लता राजगुरू, मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, सचिन ईटकर, परशुराम वाडेकर विचारमंचावर होते.

डॉ. जोशी यांनी बालपणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीचा प्रसंग सांगून बाबासाहेबांसह माई आणि रमाईंचे जीवन पुन्हा-पुन्हा अभ्यासले पाहिजे, असे आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आणि रमाई यांच्याकडे बघितल्यानंतर पती-पत्नीतील अद्वैत म्हणजे काय ते समजते. हा महोत्सव म्हणजे सृजन सोहळा असल्याचे त्यांनी नमूद केले.
अ‍ॅड. आव्हाड म्हणाले, डॉ. बाबासाहेब यांच्या जीवनातील रमाईंचे योगदान खूप मोठे आहे. रमाई या बाबासाहेबांच्या स्फूर्तिदेवता आहेत. विश्वकल्याणाची कल्पना मांडणारे डॉ. बाबासाहेब यांचा अभ्यास करताना रमाईंचेही चरित्र वाचून खूप प्रभावीत झालो. त्यांच्या नावे पुरस्कार घेताना या पुरस्कारासाठी पात्र आहोत का असाही प्रश्न मनात येतो.
पुरस्कारार्थी सुनीता वाडेकर आणि परशुराम वाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर वाटचाल करणार्‍या व्यक्तींचा सत्कार होणे ही आनंदाची गोष्ट असल्याचे सचिन ईटकर यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात महोत्सवाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी महोत्सवाची संकल्पना विषद केली आणि मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: