खराडीत रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद; विक्रमी १६४४ बाटल्यांचे संकलन

पुणे : ‘नसे केवळ हे रक्तदान, जीवनदानाचे हे पुण्य काम’ हा विचार घेऊन खराडीत प्रजासत्ताकदिनी तरुणांनी रक्तदान शिबिराला उदंड आणि अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला. सुरेंद्र पठारे फाउंडेशनने आयोजित केलेल्या शिबिरात विक्रमी १६४४ बाटल्यांचे संकलन झाले. सकाळी ८ ते ४ या वेळेत खराडी गावातील राजाराम भिकू पठारे इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित या शिबिराला जत्रेचे स्वरूप आले होते. परंतु, योग्य नियोजन आणि व्यवस्था यामुळे लोकांनी सोशल डिस्टंसिंग व अन्य नियमांचे पालन करून हे शिबीर झाले.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुरेंद्र पठारे फाऊंडेशनतर्फे हे शिबीर आयोजिले होते. सकाळपासूनच परिसरातील नागरिकांनी रक्तदान करण्यास गर्दी केली. आरोग्य तपासणी करून पात्र दात्यांना रक्तदानासाठी सोडण्यात आले. रक्तदात्यांची योग्य काळजी घेतली जात होती. त्यामुळे प्रत्येक रक्तदात्यांकडून फाउंडेशचे आभार व्यक्त होत होते. प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र व अल्पोपहार देऊन त्याचे रक्तदान केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. ससून सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढी, रेडप्लस रक्तपेढी व आधार रक्तपेढी यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. या भव्य रक्तदान शिबिराच्या आयोजनाबद्दल परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी फाउंडेशनचे व सुरेंद्र पठारे यांचे अभिनंदन केले.

सुरेंद्र पठारे म्हणाले, “समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करण्याच्या उद्देशाने फाउंडेशनची सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. शासन, तसेच अनेक संस्था वारंवार रक्तदान करण्याबाबत आवाहन करत असतात. हीच बाब लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना हातभार लावावा, या विचारातून शिबिराचे आयोजन केले. रक्तदान करून प्रजासत्ताक दिनी राष्ट्राला अभिवादन करावे, अशीही भावना यामागे होती. फाउंडेशनने केलेल्या आवाहनाला तरुणांनी, नागरिकांनी अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद दिला, याचा आनंद वाटतो. खराडीसह अन्य परिसरातूनही लोक मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी झाले. एका दिवसात एके ठिकाणी १६४४ लोकांनी रक्तदान केल्याचा विक्रम नोंदवला जाईल, याचाही आनंद आहे. भविष्यातही फाउंडेशनमार्फत समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील.”
सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या सर्व स्वयंसेवकांनी व मित्र परिवाराने या शिबिराच्या यशस्वीततेसाठी कठोर परिश्रम घेतले.

Leave a Reply

%d bloggers like this: