Tuesday, June 16, 2026
PUNE

पर्यावरण संवर्धनासाठी केवळ तंत्रज्ञावर अवलंबून न राहता स्वतःत बदल घडविणे आवश्यक –  डॉ. निमिष रस्तगी यांचे मत

पुणे, दि. २३ – “आपण पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी बॅटरीची इलेक्ट्रिक वाहने आणण्याच्या गोष्टी करतो. परंतु त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या नव्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावणार याचा विचार करतो का? केवळ तंत्रज्ञावर अवलंबून राहून पर्यावरण संवर्धन होणार नाही. त्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीत बदल करणे, आपल्या वैयक्तिक सवयी सुधारणे आवश्यक आहे,” असे मत भारताच्या पत्र सूचना कार्यालयाचे (पीआयबी) संचालक डॉ. निमिष रस्तगी यांनी व्यक्त केले.

‘तेर (TERRE) पॉलिसी सेंटर’द्वारा आयोजित ‘तेर अॉलीम्पियाड’ स्पर्धेच्या ऑनलाईन पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी  ‘तेर पॉलिसी सेंटर’च्या संस्थापक अध्यक्षा डॉ. विनिता आपटे, टाटा मोटर्सच्या पॅन इंडियाचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी, देशभरातील स्पर्धक व शिक्षक सहभागी झाले होते.

ही स्पर्धा इयत्ता ५ वी ते पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते. यंदा सर्धेचे ६ वे वर्ष होते. स्पर्धेत यंदा संपूर्ण देशातून २ लाख ७४ हजार ३२९ विद्यार्थी सहभागी झाले होते. ५ वी ते ९वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘सॅपलिंग विभाग’ करण्यात येतो. या विभागात तेलंगाणाहून मुथूकुरी मनिकांता (प्रथम), पश्चिम बंगाल येथून रेमन डे व सौम्योस्री चटर्जी यांनी अनुक्रम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. तर १० वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्लांट विभाग’ करण्यात येत असून यात झारखंड येथून मोहम्मेद रेहान (प्रथम), आंध्रप्रदेशची जान्हवी गुनापू (द्वितीय), पश्चिम बंगालहून सरन्या भट्टाचार्य (तृतीय) विजयी झाले आहेत. तसेच पदवी धारकांसाठी ‘ट्री विभाग’ असून यात तेलंगाणा येथील परेड्डी, प्रवलिका नत्ते, शीलम गणेश हे अनुक्रम प्रथम तीन क्रमांकांनी विजयी ठरले. याशिवाय काही शाळांना देखील पारितोषिक प्रदान करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना लॅपटॉप, टॅब, मोबाईल फोन आदी तर ट्री विभागातील विजेत्यांना पर्यावरण विषयात इंटर्नशीप करण्याची संधी मिळणार आहे.

यावेळी डॉ. रस्तगी म्हणाले, “हा काळ असा आहे की जेंव्हा निसर्गच आपल्याला सांगत आहे की आपले काहीतरी चुकत आहे. आपण स्वतः परीक्षण करून बदलण्याची आवश्यकता आहे. पृथ्वी, ग्रह, तारे आपण असण्या आधिही होते आणि नंतरही राहणार; पण पर्यावरणाच्या हानीमुळे मात्र त्याचे दुष्परिणाम आपल्याला आणि प्राण्यांना भोगावे लागणार आहेत. म्हणून आपणच आता जागे होण्याची आवश्यकता आहे. आपल्या भविष्यासाठी व शाश्वत पर्यावरणासाठी वैयक्तिक पातळीवर तसेच मोठ्या संस्थांच्या पुढाकाराने काम करणे गरजेचे आहे. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे तसे कठीण असले तरी तो राखणे ही आपली गरज आहे.”

डॉ. आपटे म्हणाल्या, “नवीन पिढीमध्ये पर्यावरणाविषयी केवळ सजगता वाढावी एवढेच नव्हे तर त्याविषयीचा अनुभव घेता यावा यादृष्टीने ही स्पर्धा आम्ही घेत आहोत. यामुळे मुले भावनिकदृष्ट्या देखील पर्यावरणाच्या अधिक जवळ जात आहेत. हा बदल आम्हला दर वर्षीच्या स्पर्धेत प्रकर्षाने दिसून येत असून त्याचा चढता आलेखही बघायला मिळत आहे, याचे समाधान वाटते. या स्पर्धेसाठी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचेही सतत प्रोत्साहन आम्हाला लाभत असते.”

कुलकर्णी म्हणाले, “कोरोनाचा हा कठीण काळ म्हणजे आपण निसर्ग नियमांचा आदर न बाळगल्याचा परीणाम आहे. या काळातही आपण टिकून राहिलो आहोत ही सकारत्मक बाब आहे. तरीही यात आपण काही शिकलो का, याचे अवलोकन करयला हवे. आपले जीवनमान साधे सोपे ठेवून पर्यावरण पूरक जगायला आपण शिकत आहोत की नाही हे समजून वागायला हवे.”     

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading