Friday, September 4, 2026
PUNE

नगरसेवक अविनाश बागवे यांना कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान

पुणे : भारततत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे समाजातील दिनदुबळ्यांना शिक्षणाची द्वारे खुले झाली. शिक्षण, शासकीय योजनांचा फायदा घेऊन अनेक जण मोठे झाले. पण कालांतराने ही मंडळी आपल्या समाजाला, बाबासाहेबांच्या विचारांना विसरली. उच्च शिक्षण घेतलेल्या मागासवार्गीय समाजातील व्यक्ती चळवळींमध्ये येत नाहीत, अशी खंत शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केली.

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार नगरसेवक अविनाश बागवे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अ‍ॅड. प्रमोद आडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या कार्यक्रमात रमेश बागवे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका लताताई राजगुरू होत्या. भारतीय संविधाची प्रत, तिरंगी शाल, महामाता रमामाई आंबेडकर यांचा ग्रंथ आणि बोधी वृक्ष असे पुरस्काराचे स्वरूप होते. महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे हा सोहळा झाला. पुणे शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, राजेंद्र शिरसाठ, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी, अजित दरेकर, रमेश सकट, विठ्ठल थोरात, द. स. पुळेकर, किशोर वाघेला आदी विचारपीठावर होते.

रमेश बागवे म्हणाले, मागासवर्गीयांना आजही अन्याय-अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे. समाजासमोर मोठी आव्हाने आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुधारणावादी विचार अंमलात आणायला मी घरापासून सुरुवात केली. त्या वेळी माझ्यावर अनेकांनी टीका केली, पण मी मागे हटलो नाही. इतर समाजाला बोलण्यापेक्षा जाती-भेद मिटविण्यासाठी, बाबासाहेबांच्या विचारातील भारत घडविण्यासाठी स्वत:पासून सुरुवात करा, असे आवाहनही त्यांनी केले.

सत्काराला उत्तर देताना अविनाश बागवे म्हणाले, पुण्यात कोरोना महामारीचे संकट वाढलेले असताना अनेकजण घरात बसून होते. कोरोनामुळे अनेकांना दोन वेळचे जेवण मिळू शकत नव्हते. ही परिस्थिती बघून मी माझ्या सहकार्‍यांच्या मदतीने पावणेचार हजार लोकांची जेवणाची व्यवस्था केली. कोरोना झाला की, माणसाचा मृत्यू होतो, अशी भीती अनेकांच्या मनात होती. त्यामुळे तपासणी करण्यास सर्वसामान्य पुढे येत नव्हते. तपासणी करणे किती गरजेचे आहे, यासाठी नागरिकांचे घरोघरी जाऊन प्रबोधन केले. सामाजिक कार्याविषयी वडिलांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचा उल्लेख करून काही वर्षे परदेशात होतो तरीही समाजाशी, मातृभूमीशी नाळ जोडली गेली पाहिजे या विचाराने परत आल्याचे त्यांनी सांगितले.

अ‍ॅड. प्रमोद आडकर म्हणाले, कोरोना काळातच माणसाची खर्‍या अर्थाने ओळख झाली. सामान्य व्यक्ती घराबाहेर पडायला घाबरायचा त्या वेळी बागवे कुटुंबियांनी सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला. भुकेल्या व्यक्तींना अन्न देणे हे हिमालयापेक्षाही मोठे काम आहे.

रवींद्र माळवदकर, संगीता तिवारी, राजेंद्र शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात लताताई राजगुरू यांनी अविनाश बागवे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सुरुवातीस विठ्ठल गायकवाड यांनी पुरस्कार वितरणामागील भूमिका विषद केली. विठ्ठल थोरात यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading