fbpx
Friday, April 19, 2024
MAHARASHTRA

दृष्टिहीन व्यक्तींच्या कल्याणासाठी सर्वतोपरी मदत करणार – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 15 : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) संस्थेतर्फे दृष्टिहीन व्यक्तींच्या कल्याणासाठी राज्यात चालविण्यात येणाऱ्या अंध मुलींची निवासी शाळा, नेत्रचिकित्सा रुग्णालय तसेच इतर प्रकल्पांसाठी आपण सर्वतोपरी मदत करू, अशी  ग्वाही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिली.

‘नॅब’च्या महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित अंध व्यक्तींच्या कल्याणासाठी उभारण्यात येणाऱ्या ध्वज निधी संकलन मोहिमेचा आरंभ राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे झाला.

यावेळी नॅबचे उपाध्यक्ष सूर्यभान साळुंके यांनी राज्यपालांच्या जॅकेटला ध्वजाची छोटी प्रतिकृती लावली. राज्यपालांनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, दृष्टिहीन व्यक्तींची ग्रहणशक्ती सामान्य माणसापेक्षाही अधिक असते. दृष्टिहीन व दिव्यांग व्यक्ती आयएएससारख्या परीक्षा पास होत आहेत तसेच उद्योग व्यवसायात चांगली कामगिरी करीत आहेत.

अंध, दिव्यांगांच्या शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण, रोजगार व पुनर्वसनासाठी ‘नॅब’ ही संस्था अतिशय चांगले काम करीत आहे. संस्थेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी नॅबच्या नाशिक कार्यालयाला लवकरच भेट देऊ असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

नाशिक येथील दृष्टिहीन मुलींच्या निवासी शाळेतील २५ मुलींच्या शिक्षणासाठी शासन अनुदान मिळावे, ‘नॅब’ने दृष्टिहीन व्यक्तींच्या ज्ञान व मनोरंजनासाठी  नाशिक येथे ‘संवेदना उद्यान’ तयार केले आहे; त्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये संवेदना उद्यान निर्माण करावे, अंध पुनर्वसन कार्यासाठी कॉर्पोरेटसकडून सामाजिक दायित्व निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागण्यांचे निवेदन संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी राज्यपालांना दिले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी संस्थेचे सहसचिव व दिव्यांग उद्योजक भावेश भाटिया यांच्या ‘रुक जाना नहीं’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी नॅबचे कोषाध्यक्ष विनोद जाजू, सहकोषाध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर,  तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading