भाजपच खरी तुकडे तुकडे गँग आहे – सुखबीर सिंग बादल
नवी दिल्ली – केंद्र सरकारने लादलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू आहे. तर, हे कायदे मागे घेणार नाही, यावर केंद्र सरकारर ठाम आहे. त्यामुळे अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी भाजपवर टीका केली आहे.
“भाजपाच देशातील खरी तुकडे तुकडे गँग आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे. तसंच शेतकरी आंदोलादरम्यान देशाला तोडण्याचं काम त्यांनी केलं असल्याचंही बादल म्हणाले.
बादल पुढे म्हणाले की, “भाजपानं राष्ट्रीय एकतेला तुकड्यांमध्ये तोडलं आहे. त्यांनी हिंदूंना मुस्लीमांविरोधात भडकावलं आहे. आता ते शिख बांधवांबद्दलही तसंच करत आहेत. देशभक्ती असलेल्या पंजाबला भाजपा सांप्रदायिकतेच्या आगीत ढकलत आहे. आपण जय जवान जय किसान असं म्हणतो. आज जवानही आंदोलनात सहभागी झाले आहेत आणि शेतकरीही. तुम्हाला नक्की काय हवं आहे? भाजपा सरकारनं आपल्या अहंकारातून मागे हटून शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे.”
“जे सरकारच्या बाजूनं असतात त्यांना देशभक्त ठरवलं जातं आणि जे सरकारच्या बाजूनं नसतात त्यांना तुकडे तुकडे गँग म्हटलं जातं. खरी तुकडे तुकडे गँग भाजपा आहे. त्यांनी यापूर्वी हिंदू आणि मुस्लीमांच्या संबंधांचे तुकडे केले,” असंही बादल म्हणाले.
