fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

कर्म करतांना फळाची अपेक्षा धरू नये कमलेश पटेल यांचे मत

पुणे, दि. २९ – “ मन, बुद्धि आणि अहंकार हे चित्तामध्ये समाविष्ठ असते. त्यामुळे याची व्याख्या करणे खूप कठिण आहे. जगतांना आपण जे कर्म करतो तसे फळ मिळते. त्यामुळे कर्म करतांना आपली सर्व कृत्ये भगवंताला अर्पण करा. अशा वेळेस फलाची आशा चिकटणार नाही.” असे मत शहाजी महाराज आध्यात्मिक फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त व आध्यात्मिक गुरू कमलेश पटेल (दाजी) यांनी मांडले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, आणि संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या २५ व्या ऑनलाईन तत्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालेत चौथे पुष्प गुंंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी जळगाव येथील जैन एरिकेशनचे अतुल भंवरलाल जैन, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलसचिव डॉ. प्रशांत दवे आणि बिहार चे अतिरिक्त पोलिस महासंचालक विकास वैभव हे सम्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिर्टी चे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासन प्रमुख डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते.
या प्रसंगी,एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.मिलिंद पांडे, डॉ. शांतीनी बोकिल हे उपस्थित होते.
कमलेश पटेल (दाजी) म्हणाले,“ कर्म हे ब्रह्म कर्माच्या अर्थाने वापरले जाते. त्यामुळे व्यावहारिक कर्माशी त्याचा काही ही संबध नसतो. ईश्‍वर भक्तीमुळे आपल्या कर्म फळांचा नाश होतो. एकंदरीतच समर्पण किंवा भक्तीमुळे चित्तामध्ये वाढत्या क्रमाने शुध्दीकरण होत जाते.आत्मा हा परमात्म्यात विरून गेला तर त्यांच्या सर्व मर्यादा समाप्त होतात. या जन्मामध्ये मोक्ष प्राप्त झाले की मुक्ती मिळते. युवकांनी जर ध्यानाचा अभ्यास केला तर सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल.”
अतुल भंवरलाल जैन म्हणाले,“सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी यांचा प्रभाव आजही समाजावर आहे. गांधीजींची तत्वांचे अनुकरण आजच्या युगात कोणत्याही व्यवसायात करण्यासारखे आहे. गांधीजी एक क्रियाशील तत्वज्ञ होते. त्यांनी कोणत्याही गोष्टीचे आचरण प्रथम स्वतः केले. त्यानंतर ते विचार त्यांनी जगासमोर मांडले. व्यवहारिक जगात कायमच समस्यांचा सामना करावा लागतो. पण गांधीजींनी अनेक प्रश्‍नांवर टिकाऊ स्वरूपाची उत्तरे शोधली. त्याचा उपयोग आपण आपल्या व्यवहारात करावा. गांधीजीं हे शिस्तीचे भोक्ते होते. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपण अधिक जवाबदारीने वागले पाहिजे. आम्ही आत्मानंदाकडे पाठ फिरवून भौतिक जगाकडे पळत सुटलो आहोत. अशा वेळेस गांधीजींनी सांगितलेले अपरिग्रह हे तत्व आपल्या आंतरिक सुखाचा सर्वात मोठा मार्ग आहे, हे विसरता कामा नये.”
डॉ. प्रशांत दवे, “ समाज निर्मितीसाठी खेळ हे अत्यंत महत्वपूर्ण साधन आहे. खेळामध्ये ऊर्जेचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत असतो. अशा वेळेसे अध्यात्माच्या धारणेचे अनुकरण केले, तर त्याचा नक्कीच लाभ होईल. महेंद्र धोनी, करमरकर यासारख्या खेळाडूंनी हे सिद्ध करून ही दाखविले आहे. त्यांनी देशासाठी खेळून भारताचे नाव मोठे केले. त्याच प्रमाणे खेळाच्या माध्यमातून त्यांना आंतरीक आनंदही मिळाला. स्वामी विवेकांनद म्हणत होते की, एकाग्रता ही एक कला आहे आणि तिचा उपयोग सर्वच क्षेत्रात होतो.खेळामुळे बंधुभाव निर्माण होतो आणि ती भावना मानवतेच्या क्षेत्रातील पहिली पायरी आहे.”
विकास वैभव यांनी पोलिस खात्यातील अनुभव सांगतांना म्हटले की सुरूवातीच्या काळात माझी अनेक खात्यांमधून बदली करण्यात आली. त्यामध्ये मला अतिशय बहुमोल असा अनुभव आला. माझ्या कारकीर्दीत अपहरणाच्या घटना कमी होऊन गुंडांनी आत्मसमर्पण केले. नोकरीत असताना आमच्या पुढे एक प्रश्‍न ठेवला गेला की आजकाल सर्वत्र अशांतीचे वातावरण आहे. अशावेळी तुम्ही काय कराल. इतिहासाचा धांडोळा घेऊन आपल्या कामाची कार्यपद्धती ठरवा. लोकांमध्ये आत्मविश्‍वास नसल्याने गुन्हेंगारांचे फावते. अशावेळी मनात असूनही पोलिस काही करू शकत नाहीत. समर्पण भावाने काम केले तर आपण सर्वजण यशस्वी होऊ. स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्यानुसार प्रत्येकात अमर्याद ऊर्जा असते. त्याचा उपयोग केल्यास आपण निश्‍चितच यशस्वी होऊ.”
डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. मिलिंद पत्रे यांनी सूत्रसंचालन केले. रविंद्रनाथ पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading