Tuesday, June 16, 2026
MAHARASHTRATOP NEWS

ईडी, सीबीआयची भीती दाखवू नका अन्यथा…; उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंबई, दि. 27 – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या एक वर्षपूर्तीनिमित्त सामनाला मुलाखत दिली. शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी वर्षा ते मातोश्री, काँग्रेस-राष्ट्रवादीशी समन्वय, विरोधकांचे आरोप, सरकार चालवतानाची कसरत यासंदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरे देताना विरोधकांना थेट इशारा दिला आहे. मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही. हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्कृती आहे. तुम्ही कुटुंबियांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला दिला.

तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात तेव्हा अशी वेसण घालावीच लागते. ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची. सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

आडवे येणाऱ्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढं जाईल

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मला जेव्हा आव्हान मिळते तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते. एक चमत्कार महाराष्ट्राच्या मातीत आहे, तेज आहे. जेव्हा संकटे आली, आपत्त्या आल्या, भलेभले अंगावर आले पण काय झाले? असे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्राच्या वाटेला कुणी जाईल, कुणी डिवचेल तर काय होते याचे दाखले इतिहासात आहेत. भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील. अशी संकटे अंगावर घेऊन ती पचवून त्यांचा खात्मा करत महाराष्ट्र पुढे जात राहिला. महाराष्ट्र कधी थांबला नाही, कधी थांबणार नाही. कुणी कितीही आडवे आले तरी आडवे येणाऱ्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढे जाईल, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला. सरकार अकरा दिवसही चालणार नाही, त्यानंतर हे सरकार तीन महिन्यांत पडेल, हे सरकार आता आपल्याच ओझ्याने पडेल अशी अनेक ज्योतिषे आणि भाकिते वर्तवण्यात आली. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी असं बोलणाऱयांचे दात पडत आले, असे म्हटले.

सरकारला एक वर्ष होतंय. या एक वर्षाचं पान उलटताना कसं वाटतंय आपल्याला?

एक वर्ष या सरकारला पूर्ण होतंय. मी प्रामाणिकपणे सांगतोय, पण खरं म्हणजे मी शासन, प्रशासन या पठडीतला नाहीय. आमचं जे घराणं आहे ते सेवाव्रती आहे. महाराष्ट्राची सेवा करणारी आजची ही आमची सहावी पिढी आहे. आदित्यची पिढी बघितली तर आणि त्या पिढीवर एक संस्कार आहेत. सहज एक गंमत सांगत आता बोलता बोलता आठवलं, मी माझ्या आजीला म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या आईला कधी पाहिलं नाही. पण माझे आजोबा सांगायचे, अगदी बाळासाहेबही हे सांगायचे की, माझ्या आजीला असं वाटायचं की आपल्या मुलाने गव्हर्नमेंट सर्व्हंट व्हावं. माझ्या आजीच्या मुलाने म्हणजे शिवसेनाप्रमुखांनी गव्हर्नमेंट स्थापन केलं आणि तिचा नातू म्हणजे मी गव्हर्नमेंट चालवतोय. तर हा असा एक विलक्षण योगायोग असतो. परंतु सरकार बिरकार ठीक आहे. आम्ही जे आहोत ते सर्वांच्या समोर आहोत. पुनः पुन्हा त्याची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही. एका आव्हानात्मक परिस्थितीत मला ही मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. प्रशासनाचा अनुभव नाही, काही नाही. महापालिका अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असल्यामुळे केवळ मुंबईचे महापौर निवडून आल्यानंतर त्यांचं अभिनंदन करायला मी महापालिकेच्या सभागृहात जात होतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading