Saturday, September 5, 2026
MAHARASHTRATOP NEWS

आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, हिंमत असेल तर घरी या आणि अटक करा – खासदार संजय राऊत

मुंबई – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. या कारवाईविरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘ईडी असो किंवा कोणीही असो त्यांनी राजकीय पक्षाची शाखा असल्यासारखं काम करू नये’, असे म्हणत ‘सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू’, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. तसेच ‘आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. हिंमत असेल तर घरी या आणि अटक करा’, असे जाहीर आव्हानही त्यांनी दिले आहे.

संजय राऊत म्हणाले, ‘काही झालं तरी आमचं हे सरकार, आमदार आणि नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. हे सरकार पुढील चार वर्ष नाही तर त्याहीपलिकडे जाऊन २५ वर्ष कायम राहील. एजन्सीचा वापर करून जे सरकारवर दबाव आणू इच्छितात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, कितीही दहशत निर्माण करा. आता तर पुढील २५ वर्ष तुमचं सरकार येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ते स्वप्न विसरून जा. आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा आम्हाला माहिती आहे.’ तसेच ‘आमच्या सर्व आमदार आणि खासदारांच्या घरासमोर ईडीने कार्यालय थाटलं तरी आम्ही घाबरत नाही’, असेही राऊत यांनी म्हटले.

‘ज्यांचे आदेश ते पाळत आहेत त्यांच्या १०० लोकांची यादी मी पाठवून देतो. त्यांचे काय धंदे, उद्योग आहेत, मनी लॉण्ड्रिंग कशा पद्धतीने चालतं, निवडणुकीत कुठून पैसा येतो, कसा वापरला जातो, कोणाच्या माध्यमातून येतो, बेनामी काय आहे वगैरे याची कल्पना ईडीला नसली तरी आम्हाला आहे पण गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था, कायदा हा सत्ताधाऱ्यांचा गुलाम, चाकर आणि नोकर असल्यासारखं वागत असतील तर आम्ही पर्वा करत नाही. तुम्ही कितीही नोटीसी पाठवा, धाडी टाका, खोटी कागदपत्र सादर करा पण विजय शेवटी सत्याचाच होईल. फक्त महाराष्ट्रातच सत्यमेव जयतेचा विजय होऊ शकतो.’ त्याचबरोबर ‘ईडीने भाजपा कार्यालयात शाखा उघडली असावी पण आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही. अटक करायची असेल तर अटक करा. नोटीस कसल्या पाठवत आहात. हिंमत असेल तर घरी या. प्रताप सरनाईक घरी नसताना त्यांच्या घरी धाड टाकली आहे तो पुरुषार्थ नाही. भाजपाने सरळ लढाई गेली पाहिजे. शिखंडीसारखं ईडीचा, केंद्रीय सत्तेचा वापर करू नये’, अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading