Wednesday, June 17, 2026
MAHARASHTRATOP NEWS

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर-कार्यालयावर ईडीचे छापे

माजी खासदार किरीट सोमय्यांकडून कारवाईचं समर्थन

ठाणे : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केलं. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने कारवाई सुरु केली.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळत आहे. सरनाईक कुटुंबियांच्या व्यवसायाशी तसेच इतर व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे ईडीकडून तपासण्यात येत आहे. त्याशिवाय गेल्या 4 वर्षात केलेले व्यवहार ईडी तपासणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पूर्वेश सरनाईक हे युवासेनेचे सचिव आहेत. युवासेनेच्या मोहिमांमध्ये ते सक्रियपणे सहभागी असतात. पूर्वेश यांची पत्नी परिशा सरनाईक या ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. त्या प्रभाग क्रमांक 29 चे प्रतिनिधित्व करतात.

सोमय्यांकडून कारवाईचं समर्थन

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्या घरावर ईडीने केलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. सरनाईक यांनी जर बेनामी मालमत्ता जमवली असेल. मनी लॉन्ड्रिंग केली असेल किंवा खोटी कमा केली असेल तर कारवाई झालीच पाहिजे. मीही सरनाईक यांच्या बाबतीत अशा गोष्टी ऐकल्या होत्या, असं सोमय्या म्हणाले. मी आमदार आहे म्हणून माझ्यावर कारवाई करू नका, असं म्हणणं योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.

शिवसेनेचे काही नेते मग ते मुंबईतील असो की इतर ठिकाणचे महापालिकेच्या कंत्राटदारांकडून हप्ते घेतात, अशा लोकांवर कारवाई करायला नको का? असा सवालही त्यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading