राजकारण्यांचा संबंध फक्त खुर्चीशी आणि सत्ताकारणाशी -श्रीपाल सबनीस यांची टीका

– संविधान रत्न पुरस्काराने डॉ. निलम गोर्‍हे, बाबा कांबळे यांचा गौरव
पुणे : राजकीय व्यवस्था सोयीचा आणि स्वार्थाचा विचार करते देशाचा विचार करत नाहीत म्हणून जनता जागृत असावी. राजकीय पक्ष स्वार्थीच असतात, राजकीय व्यक्तींमधील स्वार्थ बदलून विवेकबुद्धी जागृत करायची असेल तर जनतेमधील विवेकशक्ती आणि एकसंघता यांची एकजूट महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. समाजाच्या शेवटच्या घटकाचेही भले करण्याची जबाबदारी संविधानाने राज्यकर्त्यांना दिली आहे. पण दुर्दैवाने या देशाचे राज्यकर्ते पहिल्या पिढीनंतर फारसे इमानदार राहिलेले नाहीत, ते इमानदार आहेत पण फक्त खुर्चीशी, सत्ताकारणाशी, असेही त्यांनी सुनावले.


भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीतर्फे 71व्या भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान रत्न पुरस्कार प्रदान सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे आणि कष्टकर्‍यांचे नेते बाबासाहेब कांबळे यांना हा पुरस्कार सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय संविधानाची प्रत, उद्देशिका, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे.


मुख्य संयोजक, रमाई महोत्सवाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद आडकर, साहित्य कला प्रसारणी सभाचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष सचिन इटकर, नगरसेविका लता राजगुरू, रवींद्र माळवदकर, अविनाश बागवे, डॉ. गौतम बेंगाळे, दादासाहेब सोनवणे, अमोल देवळेकर, शिवसेना शहरअध्यक्ष संजय मोरे, विवेक चव्हाण, आशा कांबळे, किरण साळी आदी विचारमंचावर उपस्थित होते.


सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर सडकून टिका करताना डॉ. सबनीस म्हणाले, सर्व राजकारण हे फक्त निवडणुकीच्या भोवती चालते आहे. राजकारणी लोकांचा केंद्रबिंदू खुर्ची आहे. म्हणून माणसाची उपासमार, माणसाचे दारिद्र्य, कुपोषण होत आहे. 70 वर्षात जर देशातील दारिद्य्र संपत नसेल तर ही सर्व राजकीय पक्षातील मंडळी गोट्या खेळत होती का? अभिनेत्रीसाठी राजभवनाचे दरवाजे उघडले जातात पण एखाद्या पिडीतेसाठी का उघडले जात नाही, समान नागरी कायद्याला विरोध का होत आहे, ही काय शोभेची वस्तू आहे का, असा प्रश्न करून संविधानाची अंमलबजावणी करणारी माणसे इमानदार असली पाहिजेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. जनता संविधानात्मक साक्षर, प्रगल्भ आणि प्रबळ झाली पाहिजे अशी अपेक्षा शेेवटी डॉ. सबनीस यांनी व्यक्त केली.

बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण केले. संविधानाची निर्मिती होत असताना उठलेल्या वादळात त्यांची भूमिका दीपगृहाची होती, असे सांगून डॉ, निलम गोर्‍हे म्हणाल्या, संविधानामुळे स्त्रियांना समानातेचा हक्क मिळाला, मतदानाचा हक्क मिळाला, न्याय प्रक्रियेला बळकटी मिळाली. संविधानापुढे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत ज्यामुळे संविधान हादरल्यासारखे वाटते आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. संविधानापेक्षा काही राज्यांमध्ये जात पंचायतींचा अंमल असल्याच्या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले.


बाबा कांबळे, रवींद्र माळवदकर, अविनाश बागवे यांनी मनोगत व्यक्त केले. अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी मुक्तछंदातील कवितेद्वारे बाबासाहेब आंबेडकर यांची महती विषद केली. सचिन इटकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्याख्यानातील काही दाखले दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गौतम बेंगाळे यांनी तर सूत्रसंचालन व संयोजन विठ्ठल गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: