शिस्तबद्ध पिढया घडविण्याकरीता तरुणांना सैनिकी शिक्षण गरजेचे – रवींद्र खरे यांचे मत

पुणे : भारताची सीमारेषा दिसणे आणि अबाधित राहणे हे प्रत्येक सैनिकामुळे शक्य आहे. सैनिकांकडे प्रचंड ताकद आहे, मात्र, ती व्यक्तिगतरित्या किंवा कुटुंबासाठी ते वापरत नाहीत. त्यामुळे त्यांचा आदर्श समोर ठेऊन आपल्या पुढच्या पिढया या शिस्तबद्ध आणि संस्कारित करण्यासाठी किमान दोन वर्षे प्रत्येकाला सैनिकी शिक्षण द्यायला हवे, असे मत ज्येष्ठ नाटयचित्रपट कलावंत रवींद्र खरे यांनी व्यक्त केले.  
विधायक पुणे हे गणेशोत्सवातील उत्साही कार्यकर्त्यांचे व्यासपीठ व सहयोगी संस्थांतर्फे देशासाठी लढताना शहीद झालेल्या व बेपत्ता सैनिकांच्या वीरमातांच्या सन्मान करण्यासाठी शहिदांच्या वीरमातांची भाऊबीज हा कार्यक्रम कसबा गणपती मंदिरामध्ये करण्यात आला. यावेळी अ‍ॅड.अनिल खराडकर, अनिल पानसे, विष्णू ठाकूर, संगीता ठकार, आनंद सराफ आदी उपस्थित होते. शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांच्या वीरमाता कुसुम रामचंद्र ताथवडे आणि शहीद मेजर शशीधरन नायर यांच्या  लता विजय नायर यांचा सन्मान करण्यात आला. 
देशासाठी प्राण अर्पण करणा-या सैनिकांच्या कुटुंबियांना भारत माता की जय… च्या जयघोषात कसबा गणपती मंदिराच्या परिसरात मानवंदना देण्यात आली. रांगोळी आणि फुलांच्या पायघडयांनी केलेले स्वागत, सुवासिनींनी केलेले औक्षण आणि थरथरत्या हातांनी ज्येष्ठांसह चिमुकल्यांनी केलेला सलाम असे देशप्रेमाने भारलेले वातावरण पाहताना वीरमातांना देखील अश्रू अनावर झाले. 
रवींद्र खरे म्हणाले, आपल्या घरात आईला आपण नेहमीच पाहतो. कामावरुन, शाळेतून यायला उशीर झाला, तर आई अस्वस्थ होते, पण, ज्या आईची मुले सीमेवर आहेत. तिच्या मनाची अवस्था कशी असेल, ते आपण समजून घ्यायला हवे. त्यामुळे सैनिकांची आठवण प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. गिरीश पोटपोडे, अनिल दिवाणजी, अजित पिंपळे, सुप्रिया पिंपळे, रंगावलीकार संदीप ढवळे, भोला वांजळे आदींनी आयोजनात सहभाग घेतला.

Leave a Reply

%d bloggers like this: