श्री महालक्ष्मी मंदिरात पोलीस आणि डॉक्टरांच्या हस्ते देवीची महाआरती

पुणे : शासनाच्या निर्णयाचे स्वागत करीत सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिर पोलीस व डॉक्टरांच्या हस्ते देवीची आरती करुन उघडण्यात आले. यावर्षी नवरात्रोत्सव देखील भक्तांविना अत्यंत साधेपणाने साजरा केल्यानंतर दिवाळीच्या काळात मंदिर खुले करण्यास परवानगी मिळाल्याने कोविड योद्ध्यांना आरतीकरीता आमंत्रित करुन उत्साहात मंदिर भाविकांशाठी उघडण्यात आले. 
श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे महाआरतीचे आयोजन करण्यात होते. यावेळी पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, स्वारगेट पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवडी, वैशाली शिंदे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे, डॉ.मिलींद भोई यांच्या हस्ते आरती करण्यात आली. 
स्वच्छ संस्थेच्या सुमन मोरे यांना साडीचोळी देऊन देखील गौरविण्यात आले. यावेळी ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, अमिता अग्रवाल, अ‍ॅड.प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, हेमंत अर्नाळकर, नगरसेवक प्रविण चोरबेले आदी उपस्थित होते. 
राजकुमार अग्रवाल म्हणाले, एप्रिल महिन्यापासून लॉकडाऊन झाल्यानंतर मंदिरे देखील बंद करण्यात आली होती. टप्याटप्याने सर्व गोष्टी खुल्या होत असताना आता मंदिरे देखील अनलॉक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे मंदिरावर रोजगार अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांना देखील दिलासा मिळाला आहे. मंदिरामध्ये शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून प्रवेश दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: