माणुसकी, श्रद्धा आणि प्रेमाने संकटांचा सामना करणे शक्य

पुणे : प्रामाणिकपणे साद घातल्यास मदतीला धावून येणारा आपला भारतीय समाज आहे. कोरोनासारख्या वैश्विक महामारीच्या संकटात देखील युवा शक्ती, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्ते काम करण्यास पुढे सरसावले. माणुसकी, श्रद्धा आणि प्रेमभावनेने काम करणारे हे घटक असून या मानवी भावनांच्या आधारे भारतीय नागरिक कोणत्याही संकटांचा सामना करु शकतात, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर बौद्धिक प्रमुख प्रा.सुधीर गाडे यांनी व्यक्त केले. 
शनिवार पेठेतील नेनेघाट गणेश मंडळ व व्यायामशाळेतर्फे सामाजिक संस्था कृतज्ञता समारोहात संस्थांचा वस्तुरुपी मदत देऊन सन्मान व कोविड काळात अथक परिश्रमात कार्य करणा-या कार्यकर्त्यांचा गौरव व्यायामशाळेच्या आवारात करण्यात आला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कॅन्सर इमेजिंग विभाग प्रमुख डॉ.सुजित निलेगावकर, विंझाई देवी हायस्कूलचे किसन गोरे, पंख संस्थेच्या स्मिता आपटे, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश आठवले, कोषाध्यक्ष चंद्रकांत जोगळेकर, नितीन जोशी, नितीन जोगळेकर, योगेश देशपांडे, मिलिंद आडकर आदी उपस्थित होते़ 
यावेळी विंझाई देवी हायस्कूल ताम्हिणी या आदिवासी भागात काम करणा-या संस्थेस आणि पंख या बुधवार पेठेतील महिलांच्या मुलांसाठी काम करणाºया संस्थांचा सन्मान करण्यात आला़ तसेच कोविड काळात अथक परिश्रम घेणा-या वैभव वाघ, मनोहर देशमुख व रविंद्र बोडके या कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 
प्रा.सुधीर गाडे म्हणाले, समाजाच्या जी गरज असेल, त्यासाठी आपला देह सज्ज आहे, अशी शिकवण भारतीय संस्कृतीमध्ये ॠषीमुनींनी दिली आहे. तीच शिकवण आपल्या प्रत्येक भारतीयाच्या अंगी आहे. त्यामुळे कोविडसारख्या मोठया महामारीच्या संकटकाळात त्याला तोंड देण्याचे धैर्य आपल्यामध्ये निर्माण झाले. डॉ. सुजित निलेगावकर म्हणाले, कोणत्याही संकटाच्या काळात सामाजिक कार्यकर्ते व संस्था, रुग्णालये आणि आलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आर्थिक बळ उभे करणारे देणगीदार यांचे कार्य महत्त्वाचे ठरते. मार्च महिन्यापासून सुरु असलेल्या लढाईत देखील यांचे कार्य अतुलनीय आहे. 
किसन गोरे म्हणाले, आदिवासी-कातकरी कुटुंबातील मुले आई-वडिलांसोबत रानावनात भटकतात. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आम्ही केला. आजमितीस या भागातील १०० टक्के मुले-मुली शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यातील काही विद्यार्थीनी परिचारिका म्हणून देखील नोकरी करीत आहेत. प्रकाश आठवले म्हणाले, समाजात चांगले काम करणा-या संस्था व व्यक्तिंना मंडळातर्फे दरवर्षी वस्तुरुपी मदत दिली जाते. यावर्षी संस्थांना चादरी व आवश्यक वस्तूंसह दिवाळीचा फराळ अशी एकूण १ लाख २५ हजार रुपयांची वस्तुरुपी मदत देण्यात आली. भाग्यश्री आडकर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: