प्रत्येक मराठी घराने दोन दिवाळी अंक विकत घ्यावेत; मसापचे मराठीप्रेमींना आवाहन

पुणे : १११ वर्षांची दिवाळी अंकांची समृद्ध आणि संपन्न परंपरा खंडित होऊ नये म्हणून दिवाळी अंकांच्या संपादकांनी या कोरोनाच्या संकटात जीव धोक्यात घालून आणि आर्थिक तोटा सहन करून दिवाळी अंक प्रकाशित केले आहेत. त्यांची ही उमेद आणि जिद्द निश्चितच कौतुकास्पद आहे. अशा परिस्थितीत त्यांना वाचकांची साथ मिळणे खूप महत्वाचे आहे. हा दिवाळी अंकांचा अक्षरफराळ खरेदी करण्याचा आणि भेट देण्याचा संकल्प सर्व मराठीप्रेमींनी करावा असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. ‘अशा परिस्थितीत प्रत्येक मराठी घराने किमान दोन दिवाळी अंक विकत घेऊन वाचायचा निश्‍चय केला तरी चित्र बदलू शकते. असेही प्रा. जोशी यांनी सांगितले.

प्रा. जोशी म्हणाले, ‘सर्वच वाचकांना दिवाळी अंक विकत घेऊन वाचणे शक्य होत नाही. आपली वाचनभूक भागविण्यासाठी अनेक वाचकांना ग्रंथालयावरच अवलंबून राहावे लागते. टाळेबंदीनंतर समाजाला व्यसनाधिन बनविणारी मद्यालये प्रथम सुरु झाली पण समाजमानस घडविणारी ग्रंथालये सुरु व्हावीत यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आवाज उठवावा लागला. सरकारने आता ग्रंथालये सुरु केली आहेत. दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोचविण्याच्या कामात ग्रंथालये महत्वाची भूमिका बजावत असतात. टाळेबंदीमुळे १ एप्रिल नंतर होणारी नवीन सदस्यांची नोंदणी झालेली नाही. शासनाकडून मिळणारे तुटपुंजे अनुदान कधी मिळेल याची शाश्वती नाही. तिथल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी कपात झालेली आहे. अशा बिघडलेल्या आर्थिक गणिताच्या पार्श्वभूमीवर त्यांना दिवाळी अंक खरेदी करावे लागणार आहेत. त्यासाठीचा निधी उभा करण्यासाठी गरज पडल्यास वाचनप्रेमी देणगीदारांनी या ग्रंथालयांना तात्पुरती आर्थिक मदत केली पाहिजे. दिवाळी अंकांच्या संपादकांनी आणि वितरकांनीही त्यांची परिस्थिती समजून घेऊन त्यांना सहकार्य केले पाहिजे. तरच दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोचविण्याच्या हेतू सफल होईल.’

या सर्व अडचणीतून मार्ग काढत निघणाऱ्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने विविध विषयांवर विपुल लेखन होते. प्रतिभेला बहर येतो. सर्जक शक्तीला आवाहन केले जाते. त्यातून संपादक- लेखक-वाचकांचे स्नेहबंध दृढ होतात. वाचन संस्कृती परिपुष्ट होते. विचारांना चालना मिळते. नानाविध विषयांवर मंथन होते हे जास्त महत्वाचे असेही प्रा. जोशी यांनी सांगितले.

किंमती रास्त आहेत

अनेक संपादक आणि प्रकाशक एकत्र येऊन वाचकांना सवलतीच्या दरात दिवाळी अंकाचा संच उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबवित आहेत, त्याचा साहित्यप्रेमींनी लाभ घ्यावा. आज मराठीतल्या दर्जेदार दिवाळी अंकांची किंमत २०० ते २५० रु. च्या आसपास आहे. काही अंकांची किंमत साडेचारशे रुपयांच्या आसपास. आहे. या संकटकाळातील अंकाच्या निर्मितीचा खर्च विचारात घेता ती रास्तच आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: