कॅन-हेल्पर : कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी भारताची पहिली टोल-फ्री भावनिक आधार हेल्पलाइन
पुणे, २८ -मुंबई आणि पुण्यातील कॅन्सरचे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना आता कॅन्सरशी निगडित भीती, चिंता आणि ताण यांचा सामना करण्यासाठी मदत पुरविणा-या टोल-फ्री हेल्पलाइनवर फोन करता येणार आहे. अशाप्रकारचा पहिलाच प्रयोग असलेला हा उपक्रम अनुभवी समुपदेशकांद्वारे चालविण्यात येणार असून ही सेवा ०९५११९४८९२० या टोल-फ्री नंबरवर आठवड्याच्या सर्व दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेमध्ये, इंग्रजी, हिंदी आणि मराठीतून उपलब्ध असणार आहे.
कॅन्सरचा सर्वच रुग्णांच्या भावनिक स्वास्थ्यावर परिणाम होत असतो, व प्रत्येक तीन कॅन्सर रुग्णांपैकी एका रुग्णाला आपल्या मानसिक उद्विग्नता व्यक्त करण्यासाठी हस्तक्षेपाची गरज असल्याचा अंदाज आहे- यातही चिंता आणि नैराश्य या समस्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे1. कोविड साथीच्या काळामध्ये देखभालीत पडलेला खंड, कमी झालेला सामाजिक आधार, बेरोजगारी, नोकरी सुटणे यांसारख्या समस्यांमुळे वाढत्या आर्थिक विवंचना अशा सर्व गोष्टींमुळे या मनोसामाजिक समस्यांनी अधिकच गंभीर स्वरूप धारण केले आहे.
कॅन्सरचे रुग्ण व त्यांची देखभाल करणा-या व्यक्ती, विशेषत: आजार अधिक गंभीर टप्प्यावर पोहोचलेल्या रुग्णांची विशिष्ट मनोसामाजिक गरज समजून घेत, अशा व्यक्तींना भावनिक आधार देण्यासाठी टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई आणि सिप्ला पॅलिएटिव्ह केअर अँड ट्रेनिंग सेंटर, पुणे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका (एमसीजीएम) आणि पुणे महानगरपालिका (पीएमसी) यांच्या सहयोगाने कॅन-हेल्पर (कॅन्सर हेल्पलाइन फॉर इमोशनल रिस्पाइट) ही सेवा सुरू केली आहे.
या सेवेविषयी बोलताना टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक, डॉ. बडवे म्हणाले, ”कोविड-१९ महामारीचा सर्वच रुग्णांवर अत्यंत भीषण परिणाम झाला आहे, विशेषत: कॅन्सरचे दुखणे अधिक बळावलेल्या रुग्णांसह इतर गंभीर दुर्धर आजारांशी झगडणा-या रुग्णांसाठी तर अनर्थकारक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा काळात या हेल्पलाइनच्या माध्यमातून आम्ही रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांवरील ताण व त्यांच्या चिंता कमी करण्यासाठी गरजेचे असलेले मनोसामाजिक समुपदेशन पुरवू शकू, अशी आम्हाला आशा आहे. रुग्णांच्या देखभालीत खंड पडू नये यासाठी या प्रयत्नामध्ये आम्ही पेशंट नॅव्हिगेटरचाही समावेश करणार आहोत.”
कॅन्सरच्या रुग्णांवरील मानसिक ताण, चिंता आणि नैराश्य यांची पातळी कमी करण्याच्या कामी मनोसामाजिक पाठबळ अत्यंत महत्त्वाची भूमिक बजावत असल्याचे दिसून आले आहे2.
या उपक्रमाविषयी बोलताना सिप्ला पॅलिएटिव्ह केअर अँड ट्रेनिंग सेंटरच्या विश्वस्त रुमाना हमीद म्हणाल्या, ”कोविडच्या काळामध्ये आमच्या होम केअर टीमने रुग्ण व त्यांचे कुटुंबिय यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी उपचारांत होत असलेला विलंब, नर्सिंग सेवा उपलब्ध नसल्यामुळे आपल्या कुटुंब सदस्यांना सतावणा-या चिंता आणि दिवसेंदिवस अधिकाधिक एकाकी आणि असहाय्य होत चालल्याची भावना याविषयी सांगितले, व त्यातूनच अशी सेवा सुरू करण्याची गरज आम्हाला जाणवली. या हेल्पलाइनला फोन करणा-या रुग्णांना या अनिश्चिततेच्या काळाशी जुळवून घेण्यासाठी अधिक चांगली संसाधने, धोरणे आणि आत्मविश्वास मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.”
