गणेशभक्त व नागरिकांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने मुख्य मंदिरामध्येच होणार यंदा ‘दगडूशेठ’ चा गणेशोत्सव

* धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम व दर्शनसुविधा आॅनलाईन
यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्ष कार्यक्रम करणे शक्य नसल्याने ट्रस्टने आॅनलाईन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अर्थवशिर्ष याविषयावर प.पू.स्वानंदशास्त्री पुंड महाराज यांचे निरुपण दिनांक ११ ते ३१ आॅगस्ट दरम्यान दररोज दुपारी ४ वाजता होणार आहे. याशिवाय स्वराभिषेक देखील दिनांक १८ आॅगस्ट पासून सकाळी आॅनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विविध कलाकार आपली कला श्रीं चरणी अर्पण करणार आहेत. उत्सवकाळात श्रीं ची आरती आॅनलाईन पद्धतीने भाविकांना अनुभविता येणार आहे. सकाळी ७.३० व रात्री ९ वाजता ही आरती भाविकांना सोशल मीडियाद्वारे घरबसल्या पाहता येईल.
श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
* मंदिर परिसरात दर्शनासाठी येणा-यांसाठी एलईडी स्क्रिनची व्यवस्था व सीसीटीव्हीचे सुरक्षाकवच
श्रीं चे दर्शन घेण्यासाठी येणा-या भाविकांसाठी बेलबाग चौक आणि बुधवार चौक येथे एलईडी स्क्रिन ची व्यवस्था करण्यात येणार आहे. याद्वारे भाविकांना लांबून देखील श्रीं चे दर्शन घेता येईल. तसेच मंदिरामध्ये व परिसरात कायमस्वरुपी असलेल्या ६० सीसीटिव्ही कॅमे-यांचा वॉच देखील राहणार आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना ट्रस्टतर्फे केल्या जाणार आहेत.
—————————-
भाविकांची मोठी गर्दी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी होत असते. त्यामुळे मंदिरातच उत्सव साजरा करण्याचा ट्रस्टने घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे सामाजिक भान ठेऊन व समाजस्वाथ्याच्या विचार करुन ट्रस्टने दिलासादायक निर्णय घेतला आहे. हा आदर्श निर्णय असून याचे अनुकरण केवळ राज्यात नाही तर देशात होईल, यात शंका नाही.
– मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे
दगडूशेठ गणपती ट्रस्टने मंदिरातच गणेशोत्सव साजरा करण्याचा घेतलेला निर्णय अभूतपूर्व व विवेकवृत्तीने घेतला आहे. या निर्णयामुळे पोलीस प्रशासनावर येणारा ताण हलका होणार आहे. दगडूशेठ गणपती उत्सवाप्रती भाविक व कार्यकर्त्यांच्या भावना मोडणे कठिण होते. पण, यंदा उत्सवात गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आचारसंहिता आखण्याची गरज आहे. त्याची सुरुवात दगडूशेठ गणपती ट्रस्टने केली हे अभिनंदनीय आहे.
– डॉ.रवींद्र शिसवे, पोलीस सहआयुक्त, पुणे
