Friday, June 19, 2026
PUNE

अष्टविनायक गणपती कोविड मुक्ती केंद्राद्वारे साजरा करणार सेवा उत्सव

पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांचा निर्धार ; फर्ग्युसन महाविद्यालय वसतिगृहात केंद्र

पुणे, दि. १ – समाजावर आलेल्या कोविड संकटाचे विघ्न दूर करण्याकरीता पुण्यातील मानाच्या अष्टविनायक गणपती मंडळांनी कोविड मुक्ती केंद्र उभारुन सेवा उत्सव करण्याचा निर्धार केला आहे. या अष्टविनायक गणपती मंडळांनी एकत्रितपणे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील कोविड मुक्ती केंद्राची जबाबदारी घेतली असून एकाच वेळी सुमारे ४०० रुग्णांची सोय या केंद्रामध्ये केली जाणार आहे.

मानाचा पहिला श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती आणि प्रमुख गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती हे पुण्यनगरीचे मानाचे अष्टविनायक गणपती मंडळ एकत्रित येऊन पुणे मनपाच्या सहकार्याने कोविड केअर केंद्राची सुविधा केली आहे.
याबाबत माहिती देण्याकरीता आयोजित पत्रकार परिषदेला पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, श्री कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, श्री गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, केसरी वाडा गणपतीचे अनिल सपकाळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, पुनीत बालन, नितीन पंडित, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
फर्ग्युसन महाविद्यालय वसतिगृहातील कोविड मुक्ती केंद्रामध्ये ४०० रुग्णांकरीता आवश्यक बेड व त्यामध्ये २० आॅक्सिजन बेडची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यंत आध्यात्मिक वातावरणात शरीराच्या प्रतिकारशक्ती बरोबरच मानसिक क्षमता वाढीवर येथे भर देण्यात येणार आहे. गणपती बाप्पा मोरया, कोरोनावर मात करुया…यांसारखे प्रोत्साहनपर फलक देखील केंद्रामध्ये लावण्यात येणार आहेत.
नियमीत औषधांबरोबर आयुर्वेदिक काढा पण देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तज्ञ आयुर्वेदिक १२ वैद्य रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करणार आहेत. त्यात वैद्य जातेगावकर तसेच डॉ. पराग रासने ,डॉ. अंजली करी हे वैद्यकीय सेवा मोफत देणार आहेत. पुणे शहरातील एक आदर्श कोविड केंद्र करण्याचा मानस आहे. त्याचे अनुकरण करुन अनेक सेवा संस्था त्यासाठी पुढाकार घेतील, अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading