आपात्कालीन परिस्थितीतही सरकारकचे लक्ष्य कमाई – राहुल गांधी
नवी दिल्ली, दि. २६ – काँग्रेस नेते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी विशेष श्रमिक रेल्वे गाड्यांवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकार हे गरीबांच्या विरोधातले असून संकटात अडकलेल्या लोकांचा फायदा घेत आपात्कालीन परिस्थितीला नफ्यात बदलल्याचा आरोप त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमुळे निरनिराळ्या राज्यांमध्ये अडकलेल्या प्रवासी मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी सरकारने श्रमिक ट्रेन सुरू केल्या होत्या.

रेल्वेला श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून ४२८ कोटी रूपयांचा फायदा झाल्याचे एक वृत्त राहुल गांधी यांनी ट्विट केले. “रोगराईच्या चिंतेचे ढग सर्वांच्या डोक्यावर आहेत. लोकं संकटात आहेत. त्याचा फायदा करून घेऊ शकतो. आपात्कालीन परिस्थितीला नफ्यात बदलून गरीब विरोधी सरकार कमाई करत आहे,” असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च रोजी देशात संपूर्ण लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मोठ्या संख्येने परप्रांतीय देशातील विविध शहरांमध्ये अडकले होते. त्यांना पुन्हा त्यांच्या घरांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने कामगार विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली होती. यापूर्वी त्या रेल्वे गाड्यांच्या तिकिटांच्या दरावरूनही वाद उफाळला होता. कामगारांकडून कोणत्याही प्रकारचे भाडे आकारले जात नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. तसेच याची ८५ टक्के रक्कम रेल्वेने तर १५ टक्के रक्कम ज्या राज्यांमधून प्रवासी श्रमिक जात आहेत त्या राज्यांकडून आकारल्याचे सांगण्यात आले होते.
