मला काम मिळू नये म्हणून बॉलिवूड मधील एक गँग कार्यरत; ए. आर. रेहमानचा गंभीर आरोप
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये कशाप्रकारे भेदभाव चालतो, घराणेशाही चालते याचे आरोप प्रत्यारोप होत आहेत. याच दरम्यान शनिवारी सुशांतचा शेवटचा दिल बेचारा हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार विजेते ए आर रेहमान यांनी संगीत दिले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ए आर रेहमान यांनी एका मुलाखतीत बॉलिवूडमधील काही जणांवर गंभीर आरोप केले आहेत.

‘मुकेश छाबडा हे जेव्हा माझ्याकडे काम घेऊन आले तेव्हा त्यांनी मला सांगितले की त्यांना अनेक लोकांनी माझ्याकडे जाऊ नका असे सांगितले होते. मात्र ते आले. मी चांगल्या कामांना कधीच नकार देत नाही पण माझ्या विरोधात हिंदी चित्रपटसृष्टीत एक गँग कार्यरत आहे. जी मला काम मिळू नये म्हणून माझ्या विषयी अफवा पसरवत असते. या लोकांमुळेच मला कमी काम मिळते, डार्क चित्रपट माझ्याकडे येतात. हे लोकं काहीही विचार न करता माझं नुकसान करत आहेत. पण माझा कर्मावर आणि माझ्या भाग्यावर विश्वास आहे. त्यामुळे मी आलेल्या कामाचे स्वागत करतो’, असे रेहमान यांनी एका मुलाखतीत सांगितले.
