गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी एसटी सोडणार
मुंबई, दि. 20 – यंदा गणेशोत्सवानिमित्त चाकरमन्यांना कोकणात जाता येणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झालेला असताना महाराष्ट्र शासनाने खुशखबर दिलेली आहे. कोकणात जाता यावं याकरता एसटीची सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच सण- वारांवर निर्बंध आले आहेत. म्हणून गणेशोत्सवात गावी जाता येणार नाही यामुळे अनेक चाकरमानी नाखुष आहेत. मात्र कोकणात जाऊ इच्छिणाऱ्यांसााठी एसटी उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन अनिल परब यांनी दिले आहे. तसेच, गणेसोत्सवात गर्दी होणार नाही, संसर्ग पसरणार नाही, याची काळजी घेण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.
“मुंबई आणि एमएमआर क्षेत्र, पुणे या भागातून येणाऱ्या चाकरमान्यांना कोकणात जाता यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणारी यंत्रणा सक्षम केली जात आहे. आयसीएमआर, आरोग्य विभागाकडून आम्ही गाईडलाईन्स मागवल्या आहेत. राज्य सरकार त्याविषयी अधिक माहिती घेत आहे” असे अनिल परब यांनी सांगितले.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना कोकणात प्रवेश दिला जाणार का, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही बंदी नाही, असे स्पष्टीकरण आधीच दिले होते. चाकरमानी आणि गणेशोत्सव हे एक समीकरण आहे. कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही बंदी नाही. तसेच जिल्हा प्रशासनाचे वृत्त हा अंतिम निर्णय नसल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली. मात्र कोकणात ज्या ठिकाणाहून चाकरमानी येणार आहेत, त्याच ठिकाणी त्यांची कोविड चाचणी माफक दरात करावी, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे विनायक राऊत म्हणाले होते.
तर दुसरीकडे गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.
