तिसरी घंटा, नाट्यपदे अन् बालगंधर्वांच्या आठवणींना उजाळा!
संवाद पुणेतर्फे बालगंधर्व यांच्या जयंतीनिमित्त सोशल डिस्टसिंगपाळून अनोखा कार्यक्रम
पुणे, दि. 25 – तिसऱ्या घंटेचा नाद, प्रसिद्ध नाट्यपदे आणि नटसम्राट बालगंधर्व यांच्या आठवणींनी बालगंधर्व रंगमंदिराचा परिसर गुरुवारी सायंकाळी भावनामय झाला. निमित्त होते ते विख्यात गायक-अभिनेते बालगंधर्व यांचा जन्मदिन आणि बालगंधर्व रंगमंदिरच्या 53व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येचे! संवाद पुणेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वर्षी कोरोनामुळे बालगंधर्व रंगमंदिर गेले तीन महिने बंद आहे. त्यामुळे कोणताही जाहीर कार्यक्रम होऊ शकत नसल्याने कलाकारांसह रसिकांनाही कार्यक्रमांविषयी रुखरुख लागली आहे. बालगंधर्व यांच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजे गुरुवारी बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात बालगंधर्व यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. प्रसिद्ध गायक आनंद भाटे, कीर्तनकार चारुदत्त आफळे, बालगंवर्ध यांना ऑर्गन साथ केलेले संजय देशपांडे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, बालगंवर्ध रंगमंदिराचे व्यवस्थापक सुनील मते, संवाद पुणेचे सुनील महाजन यांची उपस्थिती होती. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करून हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून नाट्यगृहे बंद आहेत, संगीत मैफली, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आहे. सांस्कृतिक राजधानीत सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी अपेक्षा सुनील महाजन यांनी या वेळी महापौरांकडे प्रास्ताविकात केली.
कार्यक्रमाची सुरुवात आनंद भाटे यांनी गायलेल्या संगीत शाकुंतल नाटकातील पंचतुंड नररुंड मालधर या नांदीने झाली. तर चारुदत्त आफळे यांनी संगीत कान्होपात्र नाटकातील पतित तु पावना म्हणविशी नारायणा हे पद सादर केले.
बालगंधर्व यांच्यामुळे संगीत नाटकाला सुवर्णयुग आले. भविष्यात नाट्यगृह सुरू व्हावे, संगीत मैफली सुरू व्हाव्यात अशी अपेक्षा आनंद भाटे यांनी यावेळी व्यक्त केली.
संजय देशपांडे यांनी बालगंधर्व यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. बालगंधर्व यांच्याविषयीच्या आठवणी सांगतांना त्यांना अश्रु आवरणे अनावर झाले.
महपौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, संवादद्वारे पुण्यातील सांस्कृतिक वारसा जोपासण्याचे काम केले जात आहे. प्रतिभावंत कलावंतांच्या मांदियाळीमुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे. आपली संस्कृती जपण्याचे काम पुणेकरांच्या वतीने होत आहे. महापौर मोहोळ यांच्या हस्ते मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.