fbpx
Friday, April 26, 2024
MAHARASHTRA

कोकणवासीयांना तात्काळ मदत करावी – प्रकाश आंबेडकर

आपत्तीग्रस्तांना ‘वंचित’च्यावतीने अन्नधान्य, कपड्यांचे वाटप !

रायगड, दि. २३ – निसर्ग वादळामुळे कोकणवासीयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून फळबाग, घरे तसेच शाळांना त्याचा मोठा फटका बसला आहे. शासनाने यांना मदतीचा हात पुढे केला असला तरी अद्यापही मदत मिळालेली नाही. त्यामुळे कोकणवासीयांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. या ठिकाणी त्यांनी अनेक कुटुंबांना आज गरजेच्या वस्तूंची मदत केली. शिवाय येत्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर गरजेच्या वस्तू, अन्न धान्याचे वाटप देखील करण्यात येणार आहे.

‘निसर्ग’ वादळाने कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. त्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आज मंडणगड तालुक्यात आले होते. सुपारी आंबा-काजू या फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच हजारो घरांचे छप्पर उडून गेले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. शाळा तसेच महावितरणचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक भागात अद्यापही वीज प्रवाह सुरळीत झालेला नाही. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावरही झाला आहे.
कोकणात गुंठा पद्धत असून कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात एकरी आणि हेक्‍टरी नुकसान भरपाई देण्याची पद्धत आहे ही पद्धत या ठिकाणी अंमलात आणू नये, गुंठा पद्धतीनेच नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच ज्या घरांचे नुकसान झाले आहे ते सरसकट न देता प्रत्येक घरांचे किती नुकसान झाले आहे ते पाहून नुकसान भरपाई देण्यात यावी, जेणे करून ते त्यांच्या पायावर उभे राहतील. अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी शासनाला केली आहे. हे सरकार कोकणवासीयांवर उभे असून कोकणातील लोकांनी पहिल्यांदाच मदत मागितली आहे. सेना त्यांना पूर्णपणे मदत करेल अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. महाड या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन या पाहणी दौऱ्याची सविस्तर माहिती प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना दिली. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading