fbpx
Saturday, December 2, 2023
MAHARASHTRA

मुख्यमंत्र्यांनी केला थेट सेंट जॉर्ज रुग्णालयात कॉल; अंध ऑपरेटरला दिली शाबासकी

मुंबई, दि २३ : दुपारी साडेबाराची वेळ. सेंट जॉर्ज रुग्णालयात आलेला कॉल नेहमीप्रमाणे राजू चव्हाण यांनी उचलला. टेलिफोन ऑपरेटर म्हणून चव्हाण यांचा नेहमीप्रमाणे हा व्यस्त दिवस होता. त्यात कोरोनामुळे चौकशीसाठी येणाऱ्या दूरध्वनींचे प्रमाणही वाढलेले. पण हा आलेला कॉल होता थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून…. राजू चव्हाण यांचे अभिनंदन करण्यासाठी !!

दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले राजू चव्हाण एक दिवसही रजा न घेता गेल्या दोन महिन्यांपासून रोज कामावर येतात. आणखी एक शारीरिकदृष्ट्या दिव्यांग ऑपरेटर संदीप शिंदेदेखील नियमितपणे मीरा रोड येथून सेंट जॉर्जला पोहोचतात आणि कर्तव्य बजावतात. चव्हाण हे दिवसपाळी तर शिंदे हे रात्रपाळीवर असतात. यासंदर्भात वृत्तपत्रांतील बातमीची दखल घेऊन स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कोविड योद्ध्यांशी बोलून त्याचे अभिनंदन करायचे ठरविले. त्याप्रमाणे ते चव्हाण यांच्याशी बोलले. मुख्यमंत्री आपले कौतुक करताहेत म्हटल्यावर आश्चर्याचा धक्का बसलेल्या चव्हाण यांनी त्याही स्थितीत या सगळ्यांचे श्रेय आपल्या वरिष्ठांना दिले आणि मी आपला खारीचा वाटा उचलला असे उद्गार काढले. “तुम्ही खूप चांगले काम करीत आहात. अशा परिस्थितीत जिथे रुग्णालयांत कर्मचाऱ्यांची गरज आहे, तुम्ही दिव्यांग असूनही कुठेही सुट्टी न घेता काम करता हा इतरांसाठी आदर्श आहे. असा सर्वांनी खारीचा वाटा उचलला तर मोठ्या लढाया जिंकता येतात” असे मुख्यमंत्री म्हणाले.

ऑपरेटरचे काम करताना केवळ दूरध्वनी जोडून देणे एवढेच काम आम्ही करीत नाही तर अनेकदा ज्यांचे कॉल येतात ते लोक रुग्णांचे नातेवाईक असतात, गोंधळलेले आणि घाबरलेले असतात. अशा वेळी त्यांना आम्ही धीर देतो त्यांना मार्गदर्शन करतो असेही चव्हाण यांनी सांगितले.

ज्ञात अज्ञात कोविड योद्धे

कोरोना काळात मदतीला धावून जाणाऱ्या अनेक लोकांनी वेळप्रसंगी कशाचीही पर्वा न करता काम केले आहे, मदत केली आहे. त्यांनी कुठलीही अपेक्षादेखील व्यक्त केलेली नाही, कसलाही मोबदला त्यांना यासाठी मिळालेला नाही. अशा ज्ञात-अज्ञात लोकांमुळे कोरोनाचा हा लढा आपण जिंकू. विशेषत: मुंबईसारख्या गजबजलेल्या ठिकाणी विविध आपत्तींमध्ये लोक माणुसकीने इतरांच्या मदतीला धावतात. ही आपत्ती निराळी आहे. या वैद्यकीय आणीबाणीत आरोग्याला धोका आहे हे माहित असूनही अशी माणुसकी न सोडता तसेच कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींच्या प्रति आदर वाटतो असे मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात.

Leave a Reply

%d bloggers like this: