सुर्यग्रहणामुळे दत्तमहाराजांच्या मूर्तीला पांढ-या वस्त्राचे आच्छादन
-कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट
पुणे : बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरातील दत्तमहाराजांच्या मूर्तीला सुर्यग्रहण असल्याने पांढ-या वस्त्राने आच्छादन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने ग्रहण पर्व काळामध्ये दत्तमहाराजांचे केवळ मुख व चरण दर्शन भाविकांना मंदिराबाहेरुन घेता आले.

ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, ग्रहण स्पर्श सकाळी १०:०१ व ग्रहणमोक्ष दुपारी १:२८ वाजता असा ग्रहणाचा एकूण पर्वकाळ ३ तास २७ मिनिटांचा होता. त्यामुळे या कालावधीत दत्तमहाराजांच्या मूर्तीवरील सर्व अलंकार व पोशाख उतरवून श्री दत्तमहाराजांचे मूर्तीस नूतन श्वेत वस्त्र परीधान करण्यात आले.
कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे म्हणाले, मंदिराच्या धार्मिक परंपरेनुसार ग्रहण पर्व कालात जलधारांनी अभिषेक, जपजाप्य, मंत्र पुरश्चरण इत्यादी सर्व धार्मिक कार्यक्रम झाले. ग्रहण पर्व काळामध्ये कोणतेही हार, पेढे वा इतर नैवेद्य मंदिरात स्वीकारले गेले नाहीत. ट्रस्टचे उत्सवप्रमुख शिरीष मोहिते व मंदिरातील पुजा-यांनी ग्रहण पर्व काळामध्ये मंदिरात जप देखील केला. तसेच श्री दत्त महाराजांना स्वहस्ते अभिषेकही केला.